बर्मिगहॅम : ब्रेंडन मॅककलमच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडच्या संघाने कसोटी क्रिकेटमध्येही आक्रमक शैली अवलंबली आहे. याला ‘बॅझबॉल’ असे संबोधले जात आहे. मात्र, आता या नव्या रूपातील इंग्लंड संघाची खरी कसोटी लागणार असून ऑस्ट्रेलियाविरुद्ध अ‍ॅशेस मालिकेतील पहिला सामना शुक्रवारपासून एजबॅस्टन मैदानावर खेळवला जाणार आहे.  

मॅककलमची प्रशिक्षक आणि बेन स्टोक्सची कर्णधार म्हणून निवड झाल्यापासून इंग्लंडने १३ पैकी ११ कसोटी सामने जिंकले आहेत. तसेच या दोघांनी खेळाडूंना पहिल्या चेंडूपासून आक्रमक शैलीत खेळण्यास सांगितल्याने इंग्लंडचे कसोटी सामने रंजक ठरत आहेत. मात्र, आता ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, स्कॉट बोलँड आणि नेथन लायन या जागतिक दर्जाच्या गोलंदाजांविरुद्ध इंग्लंडचे फलंदाज फटकेबाजी करू शकणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तसेच स्टीव्ह स्मिथ, मार्नस लबूशेन आणि ट्रॅव्हिस हेड या ऑस्ट्रेलियन फलंदाजांविरुद्ध इंग्लंडचे जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड आणि मोईन अली यांसारखे गोलंदाज किती यशस्वी ठरतात यावरही अ‍ॅशेसचा निकाल ठरू शकेल.

ऑस्ट्रेलियाने नुकतेच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावले. या स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडमध्येच झाला, ज्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा २०९ धावांनी पराभव केला. त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावला असेल. सध्या अ‍ॅशेसचा ‘अर्न’ही ऑस्ट्रेलियाकडे असून तो परत मिळवण्याचा इंग्लंडचा प्रयत्न असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

’ वेळ : दु. ३.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स टेन ५