India vs Pakistan Live: आशिया चषक २०२५ स्पर्धेतील सुपर ४ फेरीतील दुसरा सामना भारत विरूद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. याआधी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा एकतर्फी पराभव केला होता. दरम्यान सुपर ४ फेरीतील सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चांगली सुरूवात करून दिली. पण गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांकडून हवी तशी साथ मिळाली नाही. पावरप्लेच्या षटकांमध्ये भारतीय क्षेत्ररक्षकांनी २ सोपे झेल सोडले.
दुबईतील दुबई आंतराराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक झाल्यानंतर ज्या गोष्टीची अपेक्षा होती, तसंच झालं. याआधी झालेल्या साखळी फेरीतील सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकल्यानंतर पाकिस्तानच्या कर्णधारासोबत हस्तांदोलन करणं टाळलं होतं. यावेळी नाणेफेक झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या कर्णधाराकडे पाहिलं सुद्धा नाही.
भारतीय खेळाडूंनी सोडले २ सोपे झेल
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सार्थ ठरवून भारतीय गोलंदाज हार्दिक पांड्याने पहिल्याच षटकात पाकिस्तानला मोठा धक्का दिला होता. डावातील तिसऱ्याच चेंडूवर हार्दिकने साहिबजादा फरहानला आपल्या जाळ्यात अडकवलं होतं. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षण करत असताना अभिषेक शर्माकडे सोपा झेल घेण्याची संधी होती. पण त्याने हा झेल सोडला. त्यानंतर कुलदीप यादवकडे सोपा झेल घेण्याची संधी होती. पाचव्या षटकातील चौथ्या चेंडूवर सईम अयुबचा सोपा झेल घेण्याची संधी होती. पण हा झेल कुलदीपकडून सुटला. त्यानंतर आठव्या षटकात अभिषेक शर्माने आणखी एक झेल सोडला. पुढे फरहानने या संधीचा फायदा घेतला आणि आपलं अर्धशतक पूर्ण केलं.
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:
भारतीय संघ
शुबमन गिल, अभिषेक शर्मा, सूर्यकमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
पाकिस्तान संघ
साहिबजादा फरहान, सईम अय्युब, फखर झमान, सलमान अली अघा, मोहम्मद नवाझ, फहीम अशरफ, मोहम्मद हॅरिस, शाहीन शहा आफ्रिदी, हारिस रौफ, अबरार अहमद, हुसैन तलत.