India Squad Announced for Asia Cup 2025: आशिया चषक २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. आशिया चषक स्पर्धा येत्या ९ सप्टेंबरपासून युएई येथे खेळवली जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे स्पर्धा न होण्याची चिन्ह होती, पण अखेरीस या स्पर्धेला हिरवा कंदील मिळाला. या स्पर्धेत ८ संघ सहभागी होणार असून ४-४ संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तानचे संघ एकाच गटात आहेत.
भारतीय संघाने आता आशिया चषक २०२५ साठी भारतीय संघ जाहीर केला आहे. सूर्यकुमार यादव भारतीय संघाचे नेतृत्त्व करणार आहे. पुढील वर्षी होणारा टी-२० विश्वचषक २०२६ टा विचार करता आशिया चषक हा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे. भारताची सलामी जोडी कोण असणार, शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल आणि श्रेयस अय्यर या खेळाडूंना संधी मिळणार का; असे बरेचसे प्रश्न उपस्थित होत होते.
आशिया चषकासाठी कसा आहे भारताचा संघ?
आशिया चषक २०२५ साठी भारताचा १५ सदस्यायी संघाची घोषणा झाली आहे. सूर्याच्या नेतृत्त्वाखाली या संघात शुबमन गिलला संधी देण्यात आली आहे. शुबमन गिल संघाचा उपकर्णधार असणार आहे. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर तिलक वर्मादेखील संघात कायम आहे. हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल हे अष्टपैलू खेळाडू संघाचा भाग आहेत. याशिवाय जितेश शर्मा आणि संजू सॅमसन यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असतील. गोलंदाजीत हर्षित राणा, बुमराह आणि अर्शदीप हे वेगवान गोलंदाज आहेत. तर वरूण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव हे फिरकीपटू आहेत. तर फिनिशरच्या भूमिकेसाठी रिंकू सिंहची निवड करण्यात आली आहे.
श्रेयस अय्यरला टी-२० संघात पुन्हा एकदा संधी मिळालेली नाही. याचबरोबर यशस्वी जैस्वालला देखील संघाचा भाग नाहीये. केएल राहुलही आयपीएल २०२५मधील चांगल्या कामगिरीनंतर संघात स्थान निर्माण करण्यात अपयशी ठरला आहे. एकंदरीत श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल या खेळाडूंना टी-२० संघात स्थान मिळालेलं नाही.
आशिया चषक २०२५ साठी भारताचा संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हर्षित सिंह राणा, रिंकू सिंह
राखीव खेळाडू
प्रसिध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल, रियान पराग
भारत आशिया चषकातील यशस्वी संघ
आशिया चषकाचा १७ वा हंगाम ९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये होणार आहे. यावेळी भारत केवळ जिंकण्याच्या इराद्यानेच नाही तर आपले जेतेपद राखण्याच्या इराद्यानेही स्पर्धेत उतरेल. २०२३ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आशिया चषकाचा १६ वा हंगाम जिंकला होता. भारत हा आशिया चषकातील सर्वात यशस्वी संघ आहे. त्यांनी ही बहु-राष्ट्रीय स्पर्धा ८ वेळा जिंकली आहे. यावेळी भारतीय संघाला ९ व्यांदा आशिया चषक जिंकण्याची संधी असेल.