India vs Oman, Playing 11 Prediction: आशिया चषक २०२५ स्पर्धेतील सुपर ४ मध्ये प्रवेश करणारे ४ संघ ठरले आहेत. आज होणाऱ्या सामन्यात भारत आणि ओमान हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. मात्र या सामन्याच्या निकालाचा सुपर ४ च्या वेळापत्रकावर काहीच फरक पडणार नाही. पण भारतीय संघासाठी हा सामना महत्वाचा असेल कारण, ज्या खेळाडूंना गेल्या २ सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही अशा खेळाडूंना संघात स्थान दिले जाऊ शकते. त्यामुळे संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. दरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने ओमानविरुद्धच्या सामन्यासाठी काही बदल सुचवले आहेत.

आकाश चोप्राने या सामन्यासाठी भारतीय संघात बदल करण्यात यावा असा सल्ला दिला आहे. भारतीय संघ २१ सप्टेंबरला पाकिस्तानचा सामना करणार आहे. हा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. त्यामुळे बुमराहला विश्रांती दिली जावी आणि त्याच्या जागी अर्शदीप सिंगला संधी देण्यात यावी असं आकाश चोप्रा म्हणाला आहे. यासह हार्दिक पांड्याला विश्रांती देऊन त्याच्या जागी हर्षित राणाला संधी देण्यात यावी असं आकाश चोप्राचं मत आहे. भारताच्या प्लेइंग ११ मध्ये हे जर हे २ बदल केले तर फार काही फरक पडणार नाही, असं त्याचं म्हणणं आहे.

स्पर्धेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये संजू सॅमसनला संधी दिली गेली आहे. पण या दोन्ही सामन्यांमध्ये त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे त्याला या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यात यावं असं आकाश चोप्रा म्हणाला. युट्यूब चॅनेलवर बोलताना आकाश चोप्रा म्हणाला, “अर्शदीप सिंगला संधी द्या. कारण अबुधाबीत सामना आहे आणि इथे गोलंदाजांना चांगली उसळी मिळते. मोकळं मैदान असल्याने हवा सुरू असते, त्यामुळे त्याला मदत मिळू शकते.”

या सामन्यासाठी आकाश चोप्राने निवडलेली प्लेइंग ११

अभिषेक शर्मा, शुबमन गिल (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव ( कर्णधार), संजू सॅमसन, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.