scorecardresearch

IND vs AUS 3rd ODI : ‘झॅम्पा-एगर’च्या फिरकीनं फलंदाजांना गुंडाळलं; ऑस्ट्रेलियाने मालिका खिशात घातली, भारताचा दारुण पराभव

India vs Australia 3rd ODI Score Updates : ऑस्ट्रेलियाने तिसरा एकदिवसीय सामना जिंकून भारताविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेवर विजय संपादन केलं.

IND vs AUS 3rd Odi Match 22 March 2023
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ३री वनडे

India vs Australia 2023 3rd ODI Match Updates in Marathi : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा थरार रंगला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर या मालिकेच्या झालेल्या निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करून मालिका खिशात घातली. ऑस्ट्रेलियाने २-१ ने आघाडी घेत या मालिकेवर विजय संपादन केलं. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून ४९ षटकांत सर्वबाद २६९ धावा केल्या. त्यानंतर मैदानात २७० धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी उतरलेल्या भारतीय फलंदाजांची ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी पुरती दमछाक केली. अॅडम झॅम्पाच्या फिरकीपुढं भारतीय फलंदाज ढेर झाले. झॅम्पाने ४ तर एगरने २ विकेट घेत भारताचा अर्धा संघ तंबूत पाठवला. त्यामुळे भारताचा डाव गडगडला आणि ४९. १ षटकात २४८ धावांवर भारताचा आख्खा संघ गारद झाला. ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करून तिसऱ्या सामन्यात २१ धावांनी विजय मिळवला आणि मालीका २-१ ने जिंकली.

कर्णधार रोहित शर्माने आणि शुबमन गिलने भारताला पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात करून दिली होती. पण एबॉटने रोहितला तर झॅम्पाने शुबमन गिलला बाद केल्यानंतर भारताचे सलामीवीर फलंदाज तंबूत परतले. मात्र, विराट कोहलीने कांगांरुंचा समाचार घेत अप्रतिम खेळी केली. ७२ चेंडूत ५४ धावा करून विराटने भारताला विजयाच्या दिशेनं नेलं होतं. राहुलनेही विराटसोबत सावध खेळी केली. पण दोघेही बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवही तिसऱ्यांदा शून्यावर बाद होऊन गोल्डन डक झाला. एगरने सूर्यकुमारला तंबूत पाठवल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या. पण त्यानंतर हार्दिकने भारताची कमान सांभाळत ४० चेंडूत ४० धावा केल्या. मात्र, झॅम्पाने हार्दिकला आणि रविंद्रे जडेजाला बाद करून ऑस्ट्रेलियाचा विजय जवळपास निश्चित केला होता.

भारताचा कर्णधार रोहित शर्माने १७ चेंडूत ३० धावा केल्या. तर सलामीवीर फलंदाज शुबमनने ४९ चेंडूत ३७ धावांची खेळी साकारली. पण हे दोघेही सलामीवीर फलंदाज तंबूत परतल्यानंतर विराट कोहलीने चौफेर फटकेबाजी करत महत्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली. विराटसोबत के एल राहुलनेही धावसंख्येचा आलेख चढता ठेवला. के एल राहुलने ५० चेंडूत ३२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियच्या एबॉटने रोहितला बाद केलं. तर अॅडम झॅम्पाच्या गोलंदाजीवर शुबमन गिल आणि के एल राहुल बाद झाला. विराट अर्धशतकी खेळी करून चांगल्या लयमध्ये खेळत होता.

पण विराटला एगरने ५४ धावांवर असताना झेलबाद केलं.त्यानंतर अक्षर पटेल फलंदाजीसाठी मैदानात उतरला. पण त्यालाही धावांचा सूर गवसला नाही आणि तो अवघ्या २ धावांवर रनआऊट झाला. त्यानंतर मैदानात उतरलेला सूर्यकुमार पुन्हा एकदा शून्यावर बाद होऊन गोल्डन डक झाला. ७ नंबरवर फलंदाजीसाठी उतरलेल्या सूर्यकुमारला एगरने क्लीन बोल्ड केलं.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 22:12 IST

संबंधित बातम्या