भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिला सामना आज मोहालीत खेळला गेला. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या भारतीय संघाने खराब सुरुवातीनंतरही जबरदस्त फलंदाजी करत २०८ धावा धावफलकावर लावल्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेड आणि टिम डेव्हिड या दोघांच्या झुंजार खेळीने अखेरपर्यंत हार न मानता चार गड्यांनी विजय संपादन केला. कॅमेरून ग्रीन याने ३० चेंडूत ६१ धावांची खेळी केली त्याला सामनावीराच्या किताबाने गौरविण्यात आले.

उमेश यादवने १२व्या षटकात दोन गडी बाद करत सामना फिरवला. अक्षर पटेलने उपयुक्त गोलंदाजी करून भारताला विजयी मार्गावर ठेवले होते, परंतु हर्षल पटेलने टाकलेल्या १७व्या षटकात ऑसींनी पुन्हा सामना फिरवला. हार्दिक पांड्या, लोकेश राहुल व सूर्यकुमार यादव यांच्या मेहनतीवर गोलंदाजांनी पाणी फिरवले. सोडलेले दोन झेलही महागात पडले. भारतीय गोलंदाजांना २०८ धावांचा बचाव करता आला नाही आणि ऑस्ट्रेलियाने विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

कॅमेरून ग्रीन आणि स्टीव्हन स्मिथ यांची चांगलीच भागीदारी रंगली. या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी रचली. ग्रीनने यावेळी आपले धडाकेबाज अर्धशतकही साकारले. या दोघांनाही यावेळी भारतीय खेळाडूंनी झेल सोडत जीवदान दिले. सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकतोय, असे वाटत होते. पण त्याचवेळी अक्षर पटेलने ग्रीनला बाद केले आणि ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला. ग्रीनने यावेळी ३० चेंडूंत ६१ धावांची दमदार खेळी साकारली. ग्रीन बाद झाल्यावर स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल ही अनुभवी जोडी मैदानात होती. पण उमेश यादवने यावेळी एकाच षटकात या दोघांना बाद केले आणि ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलले.

हर्षल पटेलच्या १८ व्या षटकात २२ धावा आल्याने सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकला. उरलेल्या १८ पैकी १६ धावा भुवनेश्वर कुमारच्या षटकात लुटत ऑस्ट्रेलियाने सामन्यावर कब्जा केला. अखेरच्या षटकात डेव्हिड बाद झाल्यानंतर कमिन्सने विजयाची औपचारिकता पूर्ण केली.