एकेकाळी विराट कोहलीशी तुलना होणाऱ्या बाबर आझमचा धावांचा दुष्काळ संपता संपेना अशी गत झाली आहे. कसोटी प्रकारात बाबरच्या नावावर शेवटचं शतक तब्बल तीन वर्षांपूर्वी आहे. सोमवारी आफ्रिकेविरुद्धची रावळपिंडी कसोटी सुरू झाली. पाकिस्तानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. कर्णधार शान मसूदने खेळपट्टीवर स्थिरावत चांगली खेळी केली. मात्र माजी कर्णधार बाबर आझमला बॅटिंगला पोषक अशा खेळपट्टीवरही मोठी खेळी करता आली नाही. बाबर तंबूत परतताच सोशल मीडियावर त्याला उद्देशून ट्रोलिंग सुरू झालं.

अब्दुल्ला शफीक बाद झाल्यानंतर बाबर खेळायला उतरला. त्याच्याकडून संघाला मोठ्या खेळीची अपेक्षा होती. दक्षिण आफ्रिकेनेही या मालिकेसाठी फिरकीपटूंचा भरणा असलेलं आक्रमण निवडलं आहे. केशव महाराज, सिमोन हार्मेर आणि सेनुरान मुथुसामी यांची तीन षटकं बाबरने खेळून काढली. अनुभवी महाराजच्या बॉलिंगवर बाबरने चेंडू खेळून काढला मात्र तो सिली मिडऑफला टोनी द झोरीने सहज पकडला. २२ चेंडूत १६ धावांची खेळी करून बाबरला तंबूत परतावं लागलं. पाकिस्तानने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपविजेत्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला नमवत पहिली कसोटी जिंकली होती. ही कसोटी जिंकत मालिकेत निर्भेळ यश मिळवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने संघातील अनुभवी खेळाडू असणाऱ्या बाबरकडून दमदार खेळीची अपेक्षा होती. मात्र तसं झालं नाही. लाहोर कसोटीत बाबर २३ आणि ४२ धावांची खेळी करून बाद झाला होता.

२०२२ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कराची इथे झालेल्या कसोटीत बाबरने १६१ धावांची खेळी साकारली होती. त्यानंतर बाबरच्या बॅटमधून कसोटी प्रकारात शतक झालेले नाही. तीन वर्षांच्या कालावधीत त्याला केवळ तीन अर्धशतकं झळकावता आली आहेत. कसोटी संघात बाबरचं स्थान टिकलं आहे मात्र टी२० प्रकारात चांगल्या स्ट्राईकरेटच्या अभावी बाबरला संघातून डच्चू देण्यात आला आहे.

योगायोगाने २०२२ मध्ये भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली धावांसाठी झगडत होता. याच काळात बाबरने कोहलीबरोबरचा फोटो शेअर करत- this too shall pass, stay strong- #virat kohli असं म्हटलं होतं. त्या काळात धावा करण्यातलं सातत्यामुळे बाबरची विराट कोहलीशी तुलना केली जात होती. लौकिकाला साजेसा खेळ होत नसल्याने कोहलीवर टीका होत होती. त्यावेळी बाबरने हे ट्वीट केलं होतं. त्यानंतर कोहलीला सूर गवसला. त्याने भरपूर धावा केल्या. टी२० वर्ल्डकपविजेत्या संघाचा तो भाग होता. मात्र या ट्वीटनंतर बाबरच्या बॅटला लागलेलं ग्रहण काही सुटेना अशी स्थिती आहे.

बाबरने ६१ कसोटी सामन्यात पाकिस्तानचं प्रतिनिधित्व करताना ४२.३१च्या सरासरीने ४३१६ धावा केल्या आहेत. यामध्ये ९ शतकं आणि २९ अर्धशतकांचा समावेश आहे.