Ball Change Controversy at Lords: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना आज म्हणजेच ३१ जुलैपासून खेळवला जात आहे. या सामन्याची नाणेफेक इंग्लंडने जिंकली असून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यासह पाचव्या कसोटीसाठी भारताने संघात ३ मोठे बदल केले आहेत. तर जसप्रीत बुमराह या सामन्यात खेळताना दिसणार नाही. आता यादरम्यान भारतीय संघाने मॅच रेफरीकडे तक्रार केल्याचं समोर आलं आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यात अनेक वादविवाद पाहायला मिळाले. लॉर्ड्सच्या मैदानावर चेंडू बदलण्यावरून गोंधळ झाला. शुबमन गिल आणि इंग्लंडचा सलामीवीर जॅक क्रॉली यांच्यातील मैदानावर वाद, त्यानंतर जडेजा आणि बेन स्टोक्स यांनी हात न मिळवण्यावरून सुरू असलेली चर्चा थांबत नाबही तोपर्यंत गौतम गंभीर ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला, ज्याचा व्हीडिओ व्हायरल झाला. आता यादरम्यान टीम इंडियाच्या मॅनेजमेंटने चेंडूवरून आयसीसीच्या मॅच रेफरीकडे तक्रार केली आहे.
भारताने पंचांविरूद्ध आयसीसीकडे का केली तक्रार?
लॉर्ड्सच्या मैदानावर जेव्हा टीम इंडियाने दुसरा नवीन चेंडू घेतला तेव्हा तो १० षटकांनंतर खराब झाला. त्या बदल्यात भारताला १० षटकं जुना नाही तर ३० ते ३५ षटकं जुना चेंडू मिळाला. इंग्लंडने याचा फायदा घेत भारताविरूद्ध मोठी धावसंख्या उभारली आणि २२ धावांनी सामना जिंकला. या प्रकरणात, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) नियमांनुसार हस्तक्षेप करण्याची मागणी भारताने केली आहे. लॉर्ड्स कसोटीदरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिलचा चेंडू बदलण्यावरून पंचांशी वादही झाला.
जेव्हा एखादा संघ चेंडू बदलून घेतो तेव्हा त्यांना सारखाच चेंडू देणं अपेक्षित असत. म्हणजेच जर १० षटकं जुना चेंडू आहे तर बदलून दिलेला चेंडूही १० षटकं जुनाच दिला जाणं गरजेचं आहे. पहिल्या १० षटकांत स्विंग होणाऱ्या आणि सीम मूव्हमेंट करणाऱ्या एका चेंडूऐवजी त्यांना बदलून दिलेला चेंडू मऊ आणि जुना मिळाला, असं भारताचं म्हणणं आहे.
“लॉर्ड्समध्ये, १० षटकांनंतर, ड्यूक्स बॉलचा आकार बदलला, जे मालिकेत अनेकदा घडत आलं आहे. चेंडूचा आकार तपासणाऱ्या रिंगमधून चेंडू जात नव्हता. पंचांकडे १० षटकं जुना चेंडू नव्हता, त्यामुळे सामना एका महत्त्वाच्या टप्प्यावर भारतीय संघाला ३०-३५ षटकं जुना चेंडू मिळाला. स्कोअरबोर्ड पाहिला तर कळेल की तो चेंडू बदलल्यानंतर त्याचा सामन्यावर किती परिणाम झाला. गोलंदाजांना स्विंग मिळत नव्हता आणि इंग्लंडने सहज धावा केल्या.” असे एका भारतीय संघाच्या अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं.
आयसीसीकडून हस्तक्षेप करण्याची भारताची मागणी
“जेव्हा तुम्ही चेंडू बदलण्याची विनंती करता तेव्हा तुम्हाला बदली खेळाडू किती जुना असेल हे सांगितलं जात नाही. लॉर्ड्समध्ये आम्हाला सांगितलं गेलं नव्हतं की बदलून दिलेला चेंडू ३० ते ३५ षटकं जुना आहे. जर आम्हाला सांगितलं गेलं असतं, तर आम्ही १० षटकं जुन्या असलेल्या त्या विचित्र चेंडूने खेळत राहिलो असतो. आयसीसीने यात हस्तक्षेप करण्याची गरज आहे. हा नियम बदलण्याची गरज आहे,” असे ते पुढे म्हणाले.