ऑस्ट्रेलियाला धूळ चारून आंतरराष्ट्रीय कसोटी क्रमवारीत(आयसीसी) अव्वल स्थान कायम ठेवणाऱया टीम इंडियावर बीसीसीआयने बक्षिसांचा वर्षाव केला आहे. कोहली ब्रिगेडमधील प्रत्येक खेळाडूला बीसीसीआयने ५० लाखांचे रोख पारितोषिक जाहीर केले आहे, तर मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना २५ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय, सपोर्ट स्टाफमधील प्रत्येकाला १५ लाखांचे इनाम देण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची धरमशाला कसोटी ८ विकेट्सने जिंकून बॉर्डर-गावस्कर मालिका २-१ अशी जिंकली. भारतीय संघाने गेल्या सात मालिका जिंकल्या आहेत. गेल्या वर्षभरात भारतीय संघाची कसोटी विश्वातील कामगिरी उल्लेखनीय राहिली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत कोहली चांगली कामगिरी करू शकला नसला तरी याआधीच्या मालिकांमध्ये त्याने कर्णधारी कामगिरी करत धावांचे इमले रचले. श्रीलंका, द.आफ्रिका, श्रीलंका, न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि आता ऑस्ट्रेलिया संघाला नमवून भारतीय संघाने कसोटी विश्वातील आपली ‘दादागिरी’ पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवली. धरमशाला कसोटीत विराट कोहली दुखापतीमुळे खेळू शकला नसला तरी रहाणेच्या नेतृत्त्वात भारतीय खेळाडूंनी न डगमगता विजयश्री प्राप्त केला. बीसीसीआयने टीम इंडियाच्या याच उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन संघातील खेळाडूंना रोख स्वरूपात बक्षीस जाहीर केले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci announced cash awards of rs 50 lakhs for each members of indian team
First published on: 28-03-2017 at 17:59 IST