World Test Championship Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी टीम इंडियाची घोषणा नुकतीच करण्यात आली. घरेलू मैदानावर धावांचा पाऊस पाडणार सरफराज खानलाही बीसीसीआयने गुड न्यूज दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सरफराजवर अन्याय होत असल्याची चर्चा क्रीडाविश्वात रंगली होती. याबाबत खुद्द सरफराजनेही सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली होती.

त्यानंतर हर्षा भोगलेसह अनेक दिग्गज खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध जूनमध्ये होणाऱ्या फायनल सामन्याच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयवर नाराजी व्यक्त केली होती. चाहत्यांनीही सोशल मीडियावर नाराजीचा सूर उमटवला होता. अजिंक्य रहाणेला संघात सामील केलं गेलं. परंतु, मागील दोन घरेलू रणजी ट्रॉफी सीजनमध्ये धावा करणाऱ्या सरफराजला टीममध्ये का घेतलं जात नाहीय, यावरून चर्चांना उधाण आलं होतं.

नक्की वाचा – Umran Malik: ‘…तर उमरान मलिकला संघात खेळवू नका’; ‘या’ माजी दिग्गज खेळाडूची खळबळजनक प्रतिक्रिया

पण आता बीसीसीआय दुखी सरफराज खानच्या जखमांवर मलम लावण्याचा प्रयत्न करत आहे. एका वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, ७ जून ते ११ जूनपर्यंत खेळवण्यात येणाऱ्या डब्ल्यूटीसी फायनलसाठी सरफराज खानला स्टॅंड बाय खेळाडू निवडण्याचं संकेत दिलं आहे. तसंच भविष्यात टीम इंडियात समावेश करण्याच्या प्लानिंगमध्ये असल्याचंही बोललं जात आहे.

सरफराजशिवाय झारखंडचा ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, बंगालचा मुकेश कुमार आणि दिल्लीचा नवदीप सैानीचीही स्टॅंडबाय खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. या फायनलाआधी भारत सराव सामनेही खेळणार असल्याची माहिती समोर आली आहे. आयपीएलच्या प्ले ऑफ मध्ये न पोहोचणाऱ्या संघातील भारताचे काही खेळाडू इंग्लंडला जाण्याची शक्यता आहे.