भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय)अध्यक्षपद स्वीकारल्यावर जवळपास साऱ्याच धुरीणांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) सर्वोच्च पदाचे वेध लागतात. पण विद्यमान बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर हे मात्र या गोष्टीला अपवाद ठरत असल्याचे दिसत आहे. ‘आयसीसीच्या कोणत्याही पदासाठी मी उत्सुक नाही. मला आयसीसीपेक्षा बीसीसीआय महत्त्वाची वाटते,’ असे मत ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.

याबाबत ठाकूर पुढे म्हणाले की, ‘ज्यांना आयसीसीमध्ये जायचे होते, ते काही कालावधीपूर्वीच गेले आहेत. मला आयसीसीमध्ये रस नाही. पण, भारताचे हित कसे जपता येईल, याकडे माझे लक्ष असेल. जर तुम्ही भारताबद्दल विचार करू शकत नाही तर अन्य देशांबद्दल विचार करणे कठीण होऊन बसेल. कारण सध्याच्या घडीला भारतामुळेच जगभरातील क्रिकेट वृद्धिंगत होत आहे.’

भारतामध्ये झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकापेक्षा आयसीसीने पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स करंडकासाठी तीन पट निधी दिल्याची टीका ठाकूर यांनी यापूर्वी केली होती. याबाबत ते म्हणाले की, ‘ कोणत्या स्पर्धेला किता निधी दिला जातो, याचा साधारण विचार केला जायला हवा. बीसीसीआयचे क्रिकेट विश्वामध्ये वजन वाढले असले तरी त्यांना आयसीसीच्या वित्त समितीने स्थान देण्यात आलेले नाही.’

आयसीसीने क्रिकेटच्या सुविधांवर भर द्यावा

माझा आयसीसीवर आकस नाही. पण ज्या देशांमध्ये क्रिकेटच्या पायाभूत सुविधा नाहीत तिथे आयसीसीने लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी स्पर्धावरील खर्च कमी करून सुविधांसाठी आर्थिक तजवीज करायला हवी. भारतामध्ये क्रिकेट फार मोठय़ा प्रमाणात असले तरी आम्ही फार कमी निधीमध्ये ही स्पर्धा पार पाडली. त्याचबरोबर काही देशांनाही आम्ही मदत करत आहोत. आयसीसीने स्पर्धावर उधळपट्टी न करत सुविधांवर भर द्यायला हवा.