बीसीसीआयने सध्या सुरु असलेल्या विंडीज दौऱ्यातील टी-२० मालिकेसाठी व आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टी-२० व कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. आगामी ऑस्ट्रेलिया दौरा लक्षात घेता बीसीसीआयने विंडीजविरुद्ध टी-२० मालिकेत विराट कोहली व महेंद्रसिंह धोनी यांना विश्रांती दिली आहे. याजागी रोहित शर्मा विंडीजविरुद्ध टी-२० मालिकेत संघाचं नेतृत्व करेल. याचसोबत महेंद्रसिंह धोनीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेसाठीही संघात जागा मिळालेली नाहीये. धोनीऐवजी निवड समितीने ऋषभ पंतवर विश्वास दाखवला आहे.ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत रोहित शर्माचं पुनरागमन झालं आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये त्याने केलेल्या चांगल्या कामगिरीचं फळ त्याला मिळालेलं दिसतंय.

याव्यतिरीक्त विंडीज व ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिकेसाठी बीसीसीआयने नवोदीत खेळाडूंना संधी देण्याचं ठरवलं आहे. कृणाल पांड्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० संघात तर गेल्या काही सामन्यांत स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या शाहबाज नदीमला विंडीजविरुद्ध टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात जागा मिळाली आहे. याचसोबत विंडीजविरुद्ध अखेरच्या दोन वन-डे सामन्यांसाठी बीसीसीआयने केदार जाधवलाही भारतीय संघात स्थान दिलं आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेसाठी असा असेल भारतीय संघ –

विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत, पार्थिव पटेल, रविचंद्रन आश्विन, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार

विंडीजविरुद्ध टी-२० मालिकेसाठी असा असेल भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलिल अहमद, उमेश यादव, शाहबाज नदीम

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेसाठी असा असेल भारतीय संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, खलिल अहमद