scorecardresearch

BCCI on Rohit Sharma: “संघाचे हित सर्वप्रथम…”, भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या वक्तव्यावर BCCIची नाराजी

टी२० संघाचा अजूनही मीच कर्णधार रोहित शर्माच्या या वक्तव्यावर बीसीसीआयने नाराजी व्यक्त करत आपले म्हणणे मांडले आहे. त्यामुळे रोहितच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

BCCI on Rohit Sharma: “संघाचे हित सर्वप्रथम…”, भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या वक्तव्यावर BCCIची नाराजी
सौजन्य- बीसीसीआय (ट्विटर)

भारत आणि श्रीलंका यांच्यादरम्यान एकदिवसीय मालिकेतील पहिला मंगळवारी (१० जानेवारी) खेळला जात आहे. गुवाहाटीच्या बारसपारा क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यादरम्यान भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेच्या वक्तव्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

काय म्हणाला होता रोहित शर्मा?

“मी टी२० क्रिकेट सोडू इच्छित नाही”, असे भारतीय कर्णधार रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी स्पष्ट केले. पण, रोहितचे विधान बीसीसीआयला आवडलेले नाही आणि त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. बीसीसीआयने विराट कोहली आणि रोहित यांना आधीच सांगितले होते की त्यांना टी२० संघात आता संधी देऊ इच्छित नाही. पण, तरीही रोहितने काल गुवाहाटी येथे अजूनही टी२० न खेळण्याचा निर्णय घेतला नसल्याचे विधान केलं अन् वादाला तोंड फुटले.

रोहित शर्माने आपल्या टी२० संघात खेळण्याबाबत सांगितले की, ” यापुढे टी२० क्रिकेट खेळायचे की नाही, याचा विचार मी करत होतो. पण टी२० क्रिकेटमधून बाहेर पडण्याचा विचार अद्याप तरी मी केलेला नाही.” रोहितने टी२० क्रिकेट सोडणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे यापुढेही रोहित टी२० क्रिकेटमध्ये खेळू शकतो. रोहित हा धडाकेबाज सलामीवीर आहे आणि त्याची गरज भारताच्या संघाला नक्कीच टी२० क्रिकेटमध्येही असेल. पण सध्य्याच्या घडीला बीसीसीआय भारताच्या टी२० संघात प्रयोग करत आहे. या प्रयोगात त्यांना किती यश मिळते, हे पाहावे लागेल. जर त्यांचा प्रयोग यशस्वी ठरला तर रोहितला संघात स्थान मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करावे लागतील.

बीसीसीआयने व्यक्त केली नाराजी

भारतीय संघ पुढे न्यूझीलंडविरुद्ध तीन टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठीच्या भारतीय संघात रोहित व विराट यांची निवड केली जाणार नसल्याचे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाईडस्पोर्ट्सला सांगितले होते. या दोघांशिवाय भुवनेश्वर कुमार, आर अश्विन व मोहम्मद शमी यांचाही टी२० संघासाठी विचार केला जाणार नसल्याचे सांगण्यात आले होते. पण, रोहितने आज अजूनही टी२० क्रिकेटमधून माघार घेण्याचा निर्णय घेतलेला नाही, हे स्पष्ट केले. ”मी टी२० फॉरमॅट सोडण्याचा निर्णय घेतलेला नाही,” असे रोहितने स्पष्ट केले.

रोहित शर्मा संदर्भात बोलताना बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले,”आम्हाला भारतीय क्रिकेटचे सर्वोत्तम हित जपायचे आहे, एका व्यक्तीचे नाही. संघाला आधी प्राधान्य आम्ही देतो मग तो कितीही वरिष्ठ खेळाडू असो त्याची कामगिरीवर टीम इंडियातील स्थान ठरत असते. आम्हाला वाटते की रोहित आणि विराट यांच्यापासून पुढे जाण्याची वेळ आली आहे. भविष्य लक्षात घेऊन संघांची योजना करा आणि तयार करा. पण अंतिम निर्णय निवडकर्ते घेतील. ते नक्कीच युवा खेळाडूंना संधी देतील असे मला वाटते.” बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेदरम्यान भारतीय कर्णधाराच्या हाताला दुखापत झाली होती. पण आता रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पुनरागमन केले आहे. तो आजच्या सामन्यात ८३ धावा करून बाद झाला.

हेही वाचा: IND v SL 1st ODI: द्विशतकवीराला संघात स्थान नाही, कर्णधार रोहितसह संघ व्यवस्थापानावर भडकला भारताचा माजी दिग्गज खेळाडू

कर्णधार रोहितच्या टी२० मधील भविष्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. बीसीसीआयने चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील नवीन निवड समितीकडे ही जबाबदारी सोपवली आहे. रोहितसोबतच विराट कोहली, लोकेश राहुल, मोहम्मद शमी यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंबाबतही निर्णय घेतला जाऊ शकतो.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-01-2023 at 15:38 IST

संबंधित बातम्या