पीटीआय, मुंबई
कोणत्याही माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूशी भारताचा मुख्य प्रशिक्षक बनण्यासाठी संपर्क केलेला नाही, असे स्पष्टीकरण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांनी दिले. तसेच, नवीन प्रशिक्षकाला भारतीय क्रिकेटची समज असली पाहिजे, असेही शहा म्हणाले.
सध्याचे प्रशिक्षक राहुल द्रविड आपला कार्यकाळ वाढवण्यास इच्छुक नसल्याचे समजते आहे. तसेच, ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू रिकी पॉन्टिंग आणि जस्टिन लँगर यांनी प्रशिक्षकपदाचा प्रस्ताव फेटाळल्याचा दावा केला आहे. कोलकाता नाइट रायडर्सचा प्रेरक आणि माजी फलंदाज गौतम गंभीर या पदासाठी सध्या तरी प्रबळ दावेदार दिसत आहे. ‘‘ मी किंवा ‘बीसीसीआय’ने कोणत्याही ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूशी प्रशिक्षकपदासाठी संपर्क केलेला नाही. ही महिती सर्वस्वी चुकीची आहे,’’ असे शहा यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा >>>RR vs SRH : ट्रॅव्हिस हेडने रचला इतिहास, गिलख्रिस्टचा १५ वर्षे जुना विक्रम मोडत केला ‘हा’ खास पराक्रम
पॉन्टिंग व लँगर इंडियन प्रीमियर लीगमध्ये अनुक्रमे दिल्ली कॅपिटल्स व लखनऊ सुपर जायंट्सचे प्रशिक्षक आहेत. द्रविडनंतर प्रशिक्षकपदी भारतीयच असेल याचे संकेत देताना शहा म्हणाले,‘‘राष्ट्रीय संघासाठी योग्य प्रशिक्षक निवडणे ही मोठी प्रक्रिया आहे. आम्ही अशा व्यक्तीचा शोध घेत आहोत, जो भारतीय क्रिकेटच्या रचनेला समजेल व आपल्या कामगिरीच्या जोरावर त्याने चांगली कामगिरी केली असेल.’’ ‘बीसीसीआय’ प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख ही २७ मे आहे.
‘‘भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनणे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात प्रतिष्ठित काम आहे. भारतीय संघाचे जगभरात चाहते आहेत. आमच्या खेळाला चांगला इतिहास आहे व या खेळाला घेऊन सर्वजण उत्साहित असतात. ‘बीसीसीआय’ला अशा योग्य उमेदवाराची निवड करावी लागेल, जो भारतीय क्रिकेटला आणखी पुढे नेईल,’’ असे शहा यांनी सांगितले.
लक्ष्मणच्या जबाबदारीविषयी प्रश्नचिन्ह
भारताचा माजी फलंदाज व्ही.व्ही.एस लक्ष्मण भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी फारसा उत्सुक नसल्याचे समोर आले आहे. पण, या वर्षी सप्टेंबरमध्ये लक्ष्मणचा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत आहे. अशा वेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) लक्ष्मणच्या अनुभवाचा कसा उपयोग करून घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. माजी सलामी फलंदाज, ‘आयपीएल’मध्ये कोलकाता संघाच्या प्रेरकाच्या भूमिकेत असणाऱ्या गौतम गंभीरचे पारडे प्रशिक्षकाच्या शर्यतीत जड मानले जात आहे. ‘बीसीसीआय’ने या संदर्भात कुठलेही थेट विधान केले नसले, तरी सचिव जय शहा यांनी एकही ऑस्ट्रेलियन या शर्यतीत नसल्याचे सांगत एकप्रकारे भारतीयाच्याच नियुक्तीचे सुतोवाच केले आहे.
पॉन्टिंग, लँगर काय म्हणाले?
आपल्याला प्रशिक्षकपदासाठी विचारणा करण्यात आली होती. मात्र, आपल्या जीवनशैलीशी ताळमेळ न बसल्याने हा प्रस्ताव फेटाळला असल्याचे पॉन्टिंगने सांगितले होते. ‘‘मी राष्ट्रीय संघाचा प्रशिक्षक नक्कीच बनू इच्छितो, मात्र मला माझे आयुष्य आहे. मला घरी वेळ द्यायचा आहे. सर्वांना माहीत आहे की, भारतीय संघाचा प्रशिक्षक झाल्यावर तुम्ही ‘आयपीएल’ संघासोबत काम करू शकत नाही. मी मुलासोबत या प्रस्तावाबाबत चर्चा केली. तेव्हा त्याने हा प्रस्ताव स्वीकारण्यास सांगितले. आपण काही वर्षे तेथे राहू, असेही तो म्हणाला. माझ्या कुटुंबाला भारत आणि त्यांच्या क्रिकेट संस्कृतीबाबत प्रेम आहे. मात्र, सध्या आपल्या जीवनशैलीशी ताळमेळ बसताना दिसत नाही,’’ असे पॉन्टिंग म्हणाला. लँगरही एका मुलाखतीत म्हणाले,‘‘ ऑस्ट्रेलियन संघासोबत चार वर्षे प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली आहे. मात्र, या कामात थकवा येतो. मी केएल राहुलसोबत याबाबत चर्चा करत होतो. ‘आयपीएल’ संघात तुम्हाला दबाव व राजकारण दिसते, तर त्याच्या हजार पटीने ते भारतीय संघाच्या प्रशिक्षणामध्ये असते, असे राहुल म्हणाला होता. हा चांगला सल्ला होता. हे पद आकर्षक आहे, पण माझ्यासाठी नाही.’’