पीटीआय, नवी दिल्ली

भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चांमध्ये तथ्य नसून दोघांत चांगले संबंध असल्याचे वक्तव्य भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी केले. तसेच धावांसाठी झगडणाऱ्या रोहितला लवकरच सूर गवसेल असा विश्वासही शुक्लांनी व्यक्त केला.

भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत १-३ असा पराभव पत्करावा लागला. रोहित, विराट कोहली आणि अन्य भारतीय फलंदाजांच्या कामगिरीवर प्रशिक्षक गंभीर प्रचंड नाराज असल्याची चर्चा होती. बेजबाबदार फटकेबाजीमुळे गंभीरने भारतीय फलंदाजांना खडेबोल सुनावल्याचेही म्हटले गेले. मात्र, यात तथ्य नसल्याचे शुक्ला म्हणाले.

हेही वाचा >>>Wankhede Stadium : वानखेडेवर सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या टॉप-५ खेळाडूंपैकी पहिले तीन आहेत ‘हे’ मुंबईकर

‘‘निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि प्रशिक्षक गंभीर यांच्यात किंवा गंभीर आणि कर्णधार रोहित यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत. याबाबत सुरू असलेल्या सर्व चर्चा तथ्यहीन आहेत. काही माध्यमकर्त्यांनी खोटी माहिती पसरविण्याचा प्रयत्न केला आहे,’’ असे शुक्ला यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘‘कर्णधारपद माझ्याकडेच राहिले पाहिजे अशी कोणतीही मागणी रोहितने केलेली नाही. मात्र, त्याला बदलण्याचा आमचा विचारही नाही. तो भारतीय संघाचा कर्णधार आहे. धावा होणे, न होणे हा खेळाचा भागच आहे. प्रत्येकच खेळाडूला या टप्प्यातून जावे लागते. आपण लयीत नसल्याचे रोहितने ओळखले आणि तो स्वत:हून संघाबाहेर झाला. हे खूप मोठे पाऊल होते,’’ असे शुक्ला यांनी नमूद केले.