भारताने पहिल्या कसोटीत चांगली सुरूवात करत धावांचा डोंगर उभारला आहे. यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल आणि ऋषभ पंत यांच्या शतकांच्या जोरावर भारताने लीड्स कसोटीत ४७१ धावा केल्या आहेत. दुसऱ्या दिवशी लंचब्रेकपूर्वी भारताने झटपट ३ विकेट्स गमावले आणि लंचनंतर ३-४ षटकांतच भारताचा संपूर्ण डाव कोसळला. जोश टंगने अखेरची विकेट घेतल्यानंतर बेन स्टोक्सने सेलिब्रेशन केलं, ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
लंचब्रेकपूर्वी भारताने ७ बाद ४५४ धावा केल्या होत्या. त्यानंतर लंचब्रेकनंतर पहिल्याच षटकात बुमराह झेलबाद झाला. यानंतर जोश टंगने पहिल्या चेंडूवर जडेजाला क्लीन बोल्ड केलं. तर षटकातील अखेरच्या चेंडूवर प्रसिध कृष्णाला क्लीन बोल्ड करत भारताला सर्वबाद केलं. यासह जोश टंगने ४ विकेट्स घेत झटपट भारताचा डाव आटोपला.
भारतीय संघ लंचब्रेकनंतर ३ षटकांत सर्वबाद झाला, प्रसिध कृष्णाची विकेट घेताच बेन स्टोक्सने जे सेलिब्रेशन केलं त्याने सर्वांचं लक्ष वेधलं. बेन स्टोक्सने दोन्ही हातांनी काहीतरी खात असल्याची अॅक्शन केली. टंगकडे पाहत त्याने दोन्ही हातांनी खाऊ खाण्याची अॅक्शन केली आणि नंतर हाईव फाईव दिलं. स्टोक्सच्या या सेलिब्रेशनचा अर्थ नेमका काय आहे, हे स्टुअर्ट ब्रॉडने सांगितलं.
स्काय स्पोर्ट्सने भारतीय संघ ऑलआऊट झाल्यानंतर बेन स्टोक्सने केलेल्या सेलिब्रेशनचा व्हीडिओ पोस्ट केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी स्टोक्सच्या सेलिब्रेशनचा अर्थ काय आहे, हे विचारलं. यानंतर स्काय स्पोर्ट्सची पोस्ट रिपोस्ट करत स्टुअर्ट ब्रॉड म्हणाला, याचा अर्थ “शेपूट लवकर गुंडाळणं, खालच्या फळीला फलंदाजांना लवकर बाद करणं.”
हेडिंग्लेमधील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडने टंगमुळे भारताच्या खालच्या फळीला स्वस्तात बाद केलं. शनिवारी टीम इंडियाने ४१ धावांत ७ विकेट गमावल्या. पहिल्या दिवसाच्या खेळानंतर ३ बाद ३५९ धावांवरून सुरुवात करणाऱ्या ऋषभ पंतने सकाळच्या सत्रात भारताला झटपट धावा करून दिल्या आणि आपलं शतकही झळकावलं. परंतु लागोपाठ विकेट्स गमावल्यानंतर भारताचा डाव कोसळला.
भारतीय कर्णधार शुबमन गिलने कसोटी क्रिकेटमधील त्याची सर्वोच्च धावसंख्या नोंदवली, तो १४७ धावा करून बाद झाला. ऋषभ पंतने १३४ धावा केल्या. यशस्वी जैस्वालने १०१ धावांची खेळी केली. इंग्लंडकडून जोश टंग आणि बेन स्टोक्सने १-१ विकेट घेतली. ब्रायडन कार्स आणि शोएब बशीर यांनी १-१ विकेट घेतली.