Team India on Suryakumar Yadav: एकदिवसीय विश्वचषक २०२३ला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून यावेळी भारताकडे याचे यजमानपद असणार आहे. आयसीसीच्या नियमांनुसार या स्पर्धेसाठी सर्व संघांची घोषणा ५ सप्टेंबरपर्यंत करणे आवश्यक आहे. अनेक देशांचे संघ जाहीर झाले आहेत, मात्र यजमान भारताचा संघ अद्याप जाहीर झालेला नाही. बीसीसीआय लवकरच एकदिवसीय विश्वचषकासाठी संघाची घोषणा करू शकते. या संघात २७ सप्टेंबरपर्यंत बदल करता येतील. माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफरने एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या संघात सूर्यकुमार यादवच्या जागी तिलक वर्माचा समावेश करावा अशी मागणी केली आहे.
आशिया चषक २०२३ मध्ये नेपाळ विरुद्ध भारताच्या सामन्यापूर्वी एका स्पोर्ट्स वेबसाइटशी बोलताना जाफरने सांगितले की, “सूर्यकुमारला वन डे फॉरमॅटमध्ये खूप संधी देण्यात आल्या मात्र, त्यात त्याला यश आलेले नाही. भारताच्या संभाव्य विश्वचषक संघाबद्दल विचारले असता, जाफरने सांगितले की, “तो संघ आशिया चषक २०२३ संघासारखाच असणार आहे.” माजी खेळाडूने दोन बदलांचा सल्ला दिला आणि म्हटले की, “प्रसिद्ध कृष्णा आणि सूर्यकुमार यादव कदाचित संघात येऊ शकणार नाहीत.”
मुंबईकर माजी खेळाडू जाफर म्हणाला, “मी कदाचित प्रसिद्ध कृष्णाला संघातून वगळेन तसेच, फलंदाजीमध्ये तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्यापैकी एकाची निवड करेन पण ते करण खूप कठीण असणार आहे. त्या दोघांपैकी मी तिलक वर्माची निवड करेन, जरी त्याने भारतासाठी एकही एकदिवसीय क्रिकेट खेळले नसले तरी. त्याची फलंदाजी आणि टी२० मधील खेळ, मला वाटते की तो एकदिवसीय क्रिकेटसाठी अधिक अनुकूल आहे. सूर्यकुमारमध्ये भरपूर क्षमता आहे आणि अनेक संधी मिळूनही त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने त्याची छाप सोडलेली नाही.”
वसीम जाफर पुढे म्हणाला की, “भारतीय संघाबद्दल चिंता होती, पण संघ निवडताना निवड समिती योग्य तोच निर्णय घेईल.” जाफर म्हणाला, “जस्प्रीत बुमराह १० षटके टाकू शकेल की नाही ही एकच चिंता आहे. त्याने अजून एकदिवसीय सामन्यामध्ये पूर्ण क्षमतेने गोलंदाजी केलेली नाही. मात्र, मला आशा आहे की तो आयर्लंडमध्ये चांगला खेळला आहे. के.एल. राहुल अद्याप खेळलेला नाही, आशा आहे की तो एकदा फिटनेस टेस्ट पास झाला की त्याला खेळण्याची संधी मिळेल. प्लेईंग ११मध्ये संधी मिळते की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे. नेपाळविरुद्धच्या सामन्यात आणि नंतर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मला फारसा बदल दिसत नाही.” भारताचा पहिला सामना हा चेन्नईमधील चेपॉक स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ ऑक्टोबर रोजी होणार आहे. १४ ऑक्टोबरला अहमदाबाद येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे.