Bumrah And Siraj take per head six wickets : जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्या दमदार गोलंदाजीमुळे भारताने केपटाऊनमध्ये शानदार विजय मिळवला. त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव केला आणि मालिका १-१अशी बरोबरीत सोडवली. टीम इंडियासाठी सिराजने पहिल्या डावात सहा विकेट घेतल्या आणि बुमराहने दुसऱ्या डावात सहा विकेट्स घेतल्या. या दोन्ही गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना खेळपट्टीवर टिकू दिले नाही. भारतासाठी १० वर्षांनंतर कसोटीत असे घडले आहे जेव्हा संघाच्या दोन वेगवान गोलंदाजांनी विदेशात प्रत्येकी सहा विकेट्स घेतल्या.
भारतासाठी, यापूर्वी फक्त एकदाच दोन वेगवान गोलंदाजांनी विदेशी भूमीवर कसोटीत सहा किंवा त्याहून अधिक बळी घेतले होते. २०१४ मध्ये लॉर्ड्स येथे इंग्लंडविरुद्ध भुवनेश्वर कुमारने पहिल्या डावात सहा आणि इशांत शर्माने दुसऱ्या डावात सात विकेट्स घेतल्या होत्या. टीम इंडियाने हा सामना ९५ धावांनी जिंकला होता.
बुमराहने केली श्रीनाथची बरोबरी –
जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेत तिसऱ्यांदा एका डावात पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. या बाबतीत त्याने जवागल श्रीनाथची बरोबरी केली. याशिवाय तो दक्षिण आफ्रिकेत भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा तिसरा गोलंदाज ठरला. त्याने ३८ विकेट्स घेतल्या आहेत. याआधी अनिल कुंबळेने ४५ तर श्रीनाथने ४३ विकेट्स घेतल्या आहेत.
सिराज आणि बुमराहने दमदार प्रदर्शन –
सिराजने पहिल्या डावात १५ धावांत सहा विकेट घेतल्या. त्याच्या वेगवान गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ ५५ धावांत गारद झाला. सिराजने एडन मार्करम, डीन एल्गर, टोनी डी जॉर्जी, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेयन आणि मार्को यान्सन यांना बाद केले होते. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या सात फलंदाजांपैकी सहा फलंदाजांना बाद केले होते. त्याचवेळी बुमराहने दुसऱ्या डावात ६१ धावांत सहा विकेट घेतल्या होत्या. त्याने दक्षिण आफ्रिकेची मधली आणि खालची फळी उद्ध्वस्त केली. बुमराहने ट्रिस्टन स्टब्स, बेडिंगहॅम, वेरेयन, यान्सन, केशव महाराज आणि लुंगी एनगिडी यांना बाद केले.
भारताने सात विकेट्सनी मिळवला विजय –
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा निर्णय चुकीचा ठरला. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ ५५ धावांवरच गारद झाला. त्यानंतर भारत १५३ धावांवर सर्वबाद झाला. सामन्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही संघांचा पहिला डाव आटोपला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी यजमानांनी दुसऱ्या डावात १७२ धावा केल्या. त्यामुळे भारताला ७९ धावांचे लक्ष्य मिळाले होते. जे भारताने तीन गडी गमावून गाठले.