Cape Verde Football Team Qualified For FIFA World Cup 2026: अवघी ५ लाख लोकसंख्या असलेल्या केप व्हर्डी या आफ्रिका खंडातील चिमुकल्या देशाने विश्वचषक फुटबॉल २०२६ स्पर्धेसाठी पात्र ठरून इतिहास घडवला. विश्वचषक स्पर्धा खेळणारा हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत चिमुकला देश. केप व्हर्डी अशा प्रकारे जगाचे लक्ष वेधून घेत असताना, भारताला मात्र आशिया चषक स्पर्धेसाठीही पात्र ठरता येत नाही. विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आपल्यासाठी अजून काही दशके दूर असल्याचेच माजी खेळाडू आणि विश्लेषकांना वाटते.

कुठे आहे केप व्हर्डी?

आफ्रिकेच्या सुदूर पश्चिम टोकापासून ६०० ते ८३० किलोमीटर अंतरावर दहा बेटांचा समूह असलेला केप व्हर्डी हा देश. या देशाची लोकसंख्या जेमतेम ५ लाख, जी मुंबईतील काही मोठ्या उपनगरांच्या लोकसंख्येपेक्षाही कमी आहे. या देशाने यंदा विश्वचषक पात्रता फेरीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत अनेक धक्कादायक निकालांची नोंद केली आणि पुढील वर्षी अमेरिका, कॅनडा, मेक्सिकोमध्ये होत असलेल्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचा चमत्कार केला. बरीच वर्षे पोर्तुगीजांची वसाहत असलेला हा देश ५० वर्षांपूर्वी म्हणजे १९७५मध्ये स्वतंत्र झाला.

अटलांटिक महासागरात अत्यंत मोक्याच्या ठिकाणी वसलेला असल्यामुळे सुरुवातीस म्हणजे १७व्या आणि १८व्या शतकात गुलामांच्या व्यापाराचे केंद्र अशी त्याची ओळख होती. पुढे व्यापारी जहाजांसाठी महत्त्वाचे विश्राम केंद्र म्हणून हा देश नावारूपाला आला. आफ्रिका खंडात असूनही, लोकशाही संवर्धन आणि अर्थव्यवस्थेच्या बाबतीत या खंडातील इतर देशांच्या तुलनेत हा देश खूप पुढे आहे. अनेक वर्षे येथे पोर्तुगीजांची सत्ता होती. पण पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त झाल्यानंतर स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी या देशाने प्रयत्नपूर्वक पावले उचलली. व्यापार आणि पर्यटन ही या देशाची प्रमुख उत्पन्नसाधने. पोर्तुगीजांमुळे येथे फुटबॉलप्रेम रुजले नि फुलले.

Cape Verde: यश कसे मिळाले?

केप व्हर्डी अतिशय चिमुकला देश असून, १० प्रमुख देशांमध्ये विखुरला आहे. जगातील दुर्मीळ देशांपैकी हा एक. कारण देशाची जितकी लोकसंख्या आहे, तितकीच जवळपास परदेशांत वसलेली आहे. यांत पोर्तुगाल, फ्रान्स, नेदरलँड्स यांचा क्रमांक वरचा लागतो. अनेक अनिवासी केप व्हर्डीयन्स या तीन देशांतील व्यावसायिक फुटबॉल लीगमध्ये खेळतात. यांतील निवडक फुटबॉलपटूंना केप व्हर्डी राष्ट्रीय फुटबॉल संघातून खेळवण्याचा धोरणात्मक निर्णय तेथील सरकार आणि फुटबॉल संघटनेने घेतला. त्याचीच फळे आता मिळू लागली आहेत.

आफ्रिका खंडात विशेषतः पश्चिम आणि उत्तर भागातून अनेक तगडे संघ अलीकडच्या काळात विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत झळकत आहेत. कॅमेरून, सेनेगल, घाना, नायजेरिया, आयव्हरी कोस्ट हे पश्चिम आफ्रिकी देश; तसेच अल्जीरिया, ट्युनिशिया, इजिप्त आणि मोरोक्को हे उत्तर आफ्रिकी देश ही काही ठळक उदाहरणे. यांतील मोरोक्कोने तर गेल्या खेपेस विश्वचषक स्पर्धेची उपान्त्य फेरी गाठून दाखवली. तेव्हा केप व्हर्डीला या व अशा अनेक प्रतिभावान संघांविरुद्ध पात्रता फेऱ्यांमध्ये खेळावे लागले, यावरून त्यांच्या कामगिरीची कल्पना यावी. या देशाने गेली अनेक वर्षे अनिवासी खेळाडूंना स्थानिक स्पर्धांमध्ये खेळू दिले. यातून स्थानिक दर्जा सुधारला आणि अनिवासींचे स्थानिकांबरोबर एकजिनसीकरणही झाले.

Cape Verde: चिमुकले मोठे, थोराड पिटुकले!

केप व्हर्डीपेक्षा कमी म्हणजे साडेतीन लाख लोकसंख्या असलेला आइसलँड विश्वचषक २०१८ स्पर्धेत खेळला. या स्पर्धेत सातत्याने खेळलेल्या पॅराग्वे या दक्षिण अमेरिकी देशाची लोकसंख्याही १० लाखांपेक्षा कमी आहे. तर दहा लाखांपेक्षा जरा अधिक लोकसंख्या असलेले त्रिनिदाद अँड टोबेगो, उत्तर आयर्लंड, एल साल्वाडोर, टोगो, हैती हे देशही विश्वचषकात खेळले. पण लोकसंख्येचा बाबतीत केप व्हर्डीपेक्षा २८०० पट मोठ्या असलेल्या भारताला विश्वचषक पात्रता फेरीचा पहिला टप्पाही बहुतेकदा ओलांडता आलेला नाही. ज्या दिवशी केप व्हर्डी विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला, त्याच्या दुसऱ्याच दिवशी आशिया चषक पात्रता फेरीत भारत सिंगापूरकडून पराभूत झाला.

फिफा क्रमवारीत भारत १३६व्या स्थानावर आहे, तर सिंगापूर १५८व्या स्थानावर! २०२७मध्ये होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेतील सहभागी संख्या २४पर्यंत वाढवण्यात आली, तरीदेखील भारत या स्पर्धेसाठी पात्र ठरू शकला नाही. विश्वचषक स्पर्धेत आजवर ८० देश खेळले. पण फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरू न शकलेल्या दहा सर्वांत मोठ्या देशांमध्ये भारताचा क्रमांक अव्वल लागतो! भारत, पाकिस्तान, बांगलादेश, इथियोपिया, फिलिपिन्स, व्हिएतनाम, थायलँड, टान्झानिया, म्यानमार आणि केनिया अशी ही यादी. सगळेच देश लोकसंख्येच्या बाबतीत कोट्याधीश, भारत तर अब्जाधीश!

भारताचे चुकते कुठे?

भारत हा क्रिकेवेड्यांचा देश म्हणून ओळखला जातो. तरी फुटबॉलविषयी प्रेम आणि ज्ञान असलेल्यांची संख्या या देशात थोडकी नाही. परंतु हे प्रेम गुणवत्ता विभागणी आणि निकालांमध्ये परिवर्तित होत नाही हेही वास्तव. याचे एक प्रमुख कारण आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फुटबॉल प्रशिक्षक रिचर्ड हूड यांनी सखोल संशोधनान्ती सविस्तर विशद केले. हूड हे एके काळी भारतीय फुटबॉल संघटनेसाठी गुणवत्ता संशोधन आणि संवर्धन प्रकल्पात कार्यरत होते. त्यांनी लिहिले, की भारतामध्ये फुटबॉल गुणवत्ता मोजक्याच राज्यांमध्ये एकवटली आहे.

मणिपूर, मिझोरम आणि गोवा या छोट्या राज्यांमध्ये सर्वाधिक सक्रिय व्यावसायिक फुटबॉलपटू राहतात. या तीन राज्यांपाठोपाठ पश्चिम बंगाल, पंजाब, केरळ आणि महाराष्ट्र यांचा क्रमांक लागतो. म्हणजेच, इतक्या विशाल भारतामध्ये ८० टक्क्यांहून अधिक फुटबॉलपटू हे केवळ या सात राज्यांमध्येच दिसून येतात. त्यातून गुणवत्तेला मर्यादा येतात. कारण सतत एकमेकांशी खेळून दर्जावृद्धी होत नाही. इतर विशाल भारतातील फुटबॉलपटू या खेळाकडे तितक्या उत्साहाने फिरकतच नाहीत.

भारतातील व्यावसायिक लीगमध्ये कोट्यवधी रुपये मिळू लागले आहेत, तरी यांत तिसऱ्या आणि चौथ्या फळीतले परदेशी खेळाडू किंवा निवृत्त झालेले पहिल्या फळीतले आंतरराष्ट्रीय खेळाडू खेळतात. त्यांचा राष्ट्रीय गुणवत्ता सुधारण्यासाठी कोणताही फायदा होत नाही. अलीकडच्या काळात युरोपातील अनेक आघाडीच्या क्लबतर्फे दिल्ली, बंगळूरु, मुंबई, नवी मुंबई या शहरांमध्ये अॅकॅडमी सुरू केल्या जात आहेत. पण यामागे या क्लबची नफेखोरी अधिक असून, त्याचाही फायदा भारतीय क्रिकेटला अद्याप तरी दिसून आलेला नाही.

फुटबॉलला क्रिकेटचे ग्रहण?

भारतातील क्रिकेट व्यवस्था ही तळागाळापासून विकसित असून, तिला संरचना आणि दिशाही आहे. याचा फायदा देशात सर्व पातळ्यांवर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही दिसून येतो. १९८०च्या दशकात विशेषतः भारताने पहिलावहिला क्रिकेट विश्वचषक जिंकल्यानंतर या खेळाकडे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात खेचला गेला.

पुढे सचिन, सौरव, धोनी, विराट, रोहित आणि या जोडीला आयपीएल अशा विविध कारणांमुळे निव्वळ स्थानिक क्रिकेट खेळणेही कुमारवयीन मुले आणि त्यांच्या पालकांसाठी सुस्थिर जीवनाचा मार्ग ठरू लागला. या रेट्यामध्ये हॉकी, बॅडमिंटन, देशी खेळ जसे मागे पडले, तीच गत फुटबॉलचीही झाली. पण इतर खेळांतून जशी ऑलिम्पिकसारख्या बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकवीर निर्माण झाले, तसे ते फुटबॉलमध्ये निर्माण होण्याची शक्यताच नव्हती. त्यामुळे या खेळात आपण आशियाई पातळीवरची प्रगतीही करू शकलो नाही. आतातर इतर आशियाई देशांचा दर्जाही वधारल्यामुळे नजीकच्याच नव्हे, तर दूरच्या भविष्यातही भारतीय फुटबॉलमध्ये गौरवास्पद कामगिरी संभवत नाही.

siddharth.khandekar@expressindia.com