एपी, अॅटलांटा
पेड्रो नेटो व एंझो फर्नांडेझ यांनी झळकावलेल्या गोलच्या जोरावर चेल्सीने ‘फिफा’ क्लब फुटबॉल विश्वचषकाच्या ‘ड’ गटाच्या सामन्यात लॉस एंजिलिस एफसीवर २-० असा विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच चेल्सीने आक्रमक खेळ करण्यास सुरुवात करीत लॉस एंजिलिस संघावर दबाव निर्माण केला. सामन्याच्या ३४व्या मिनिटाला चेल्सीला आघाडी घेण्याची संधी मिळाली. त्यांच्या नेटोने निकोलस जॅक्सनच्या पासवर लॉस एंजिलिसच्या बचावफळीला चकवीत गोल करीत संघाला आघाडीवर नेले. यानंतर लॉस एंजिलिसकडून बरोबरीचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, चेल्सीच्या भक्कम बचावामुळे त्यांना गोल करता आला. त्यामुळे मध्यंतरापर्यंत चेल्सीची १-० अशी आघाडी कायम होती.
लॉस एंजिलिस संघाने सामन्याच्या ६०व्या मिनिटाला गोल करण्याची संधी निर्माण केली. त्यांच्या डेनिस बोऊंगाचा फटका हा चेल्सी गोलरक्षक रॉबर्ट सांचेझने रोखत लॉस एंजिलिसच्या गोलची पाटी कोरीच ठेवली. सामन्याच्या ७९व्या मिनिटाला चेल्सीकडे पुन्हा आघाडी घेण्याची संधी आली. त्यांच्या फर्नांडेझने लिआम डेलापच्या पासवर गोल करीत चेल्सीची आघाडी दुप्पट केली. यानंतरही लॉस एंजिलिस संघाकडून गोल करण्याचे प्रयत्न सुरू होते. पण, त्यांना यश मिळाले नाही. आगामी सामन्यांमध्येही चेल्सीची हीच लय कायम राखण्याचा प्रयत्न असेल.
फ्लामेंगोची चमकदार कामगिरी
खेळाडूंनी केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर फ्लामेंगोने एस्पारन्स डी ट्युनिसी संघावर २-० असा विजय नोंदवला. जॉर्जिआन डी अरास्काएटाने (१७व्या मिनिटाला) सामन्याच्या पहिल्याच सत्रात गोल झळकावत फ्लामेंगोला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत संघाकडे ही आघाडी कायम होती. दुसऱ्या सत्रात फ्लामेंगोच्या लुईझ अरौजोने (७०व्या मि.) गोल करीत संघाच्या खात्यात दुसऱ्या गोलचा भरणा केला. फ्लामेंगोच्या बचावफळीसमोर प्रतिस्पर्धी संघाला एकही गोल करता आला नाही.
बोका ज्युनियर्स बेन्फिकाची बरोबरी
बोका ज्युनियर्स व बेन्फिका यांच्यातील क्लब विश्वचषकातील सामना २-२ असा बरोबरीत राहिला. बोका ज्युनियर्सने सामन्याला आक्रमक सुरुवात केली. पहिल्याच सत्रात मिगुएल मेरेन्टिएल (२१व्या मिनिटाला) व रॉड्रिगो बटागलिया (२७व्या मि.) यांनी गोल करीत संघाला २-० असे आघाडीवर नेले. मात्र, पहिल्या सत्राच्या भरपाई वेळेत बेन्फिकाकडून अँजेल डी मारियाने गोल करीत मध्यंतरापर्यंत आघाडी २-१ अशी कमी केली. दुसऱ्या सत्रात निकोलस ओटामेंडीने (८४व्या मि.) गोल करीत बेन्फिकाला २-२ अशी बरोबरी साधून दिली. अखेरपर्यंत ही बरोबरी कायम राहिली. या सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे तीन खेळाडूंना लाल कार्ड दाखवण्यात आले. यामध्ये बोका ज्युनियर्सच्या अँडर हेरेरा व निकोलस फिगल तर, बेन्फिकाच्या आंद्रेआ बेलोट्टी यांचा समावेश आहे.