CSK Gives Clarification on Dewald Brewis: आयपीएल २०२५ च्या दरम्यान चेन्नई सुपर किंग्स संघाने दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू डेवाल्ड ब्रेविसला ताफ्यात सामील केलं. दुखापतग्रस्त खेळाडू गुर्जपनीत सिंगच्या जागी चेन्नई सुपर किंग्जने ब्रेविसला २.२ कोटी रुपयांना करारबद्ध केले होते. ब्रेविसने चेन्नईसाठी या मोसमातील उर्वरित सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. पण अलिकडेच आर अश्विनने ब्रेविसच्या सीएसके संघात सामील होण्याबाबत मोठा दावा केला. यावर सीएसकेने पोस्ट शेअर करत स्पष्टीकरण दिलं आहे.
आर अश्विनच्या मते, सीएसकेने डेवाल्ड ब्रेविसला करारबद्ध करण्यासाठी काही अतिरिक्त पैसे दिले होते. आता चेन्नई सुपर किंग्जने या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. सीएसकेने या प्रकरणावर अधिकृत निवेदन जारी करून सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे. ब्रेविसची निवड आयपीएल २०२५-२७ च्या नियमांनुसार करण्यात आल्याचे सीएसकेने स्पष्ट केले आहे.
सीएसकेने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, आयपीएलच्या ‘रिप्लेसमेंट प्लेयर्स’ नियम (कलम ६.६) अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे, जो दुखापत किंवा अनुपलब्ध खेळाडूंच्या जागी नवीन खेळाडूंचा समावेश करण्याच्या बाजूने असतो. चेन्नई सुपर किंग्जने एक प्रेस रिलीज जारी करून सांगितलं की, एप्रिल २०२५ मध्ये दुखापत झालेल्या गुर्जपनीत सिंगच्या जागी डेवाल्ड ब्रेव्हिसला २.२ कोटी रुपयांच्या लीग शुल्कात करारबद्ध करण्यात आले होते.
डेवाल्ड ब्रेव्हिसला आयपीएल प्लेअर रेग्युलेशन २०२५-२७ च्या नियमांचे पूर्ण पालन करून स्वाक्षरी करण्यात आली, विशेषतः ‘रिप्लेसमेंट प्लेअर्स’ अंतर्गत कलम ६.६ जे खालीलप्रमाणे आहे: ‘परिच्छेद ६.१ किंवा ६.२ नुसार स्वाक्षरी केलेल्या बदली खेळाडूला संबंधित हंगामासाठी जखमी/अनुपलब्ध खेळाडूला दिलेल्या लीग शुल्कापेक्षा जास्त नसलेल्या लीग शुल्कात समाविष्ट केले जाऊ शकते. जर रिप्लेसमेंट खेळाडूला हंगामादरम्यान साइन केलं गेलं, तर त्याला मिळणाऱ्या लीग फीमधून त्याच्या नोंदणीपूर्वी फ्रँचायझीने खेळलेले सामने वजा केले जातील.
आर अश्विन ब्रेविसबद्दल काय म्हणाला होता?
रविचंद्रन अश्विन म्हणाला होता, ‘मी तुम्हाला ब्रेविसबद्दल सांगतो. गेल्या आयपीएल हंगामात तो सीएसके संघाचा भाग होता आणि अनेक संघ त्याला आपल्या संघाचा भाग करण्यासाठी उत्सुक होते. जास्त किंमतीमुळे अनेक संघांनी त्याला समाविष्ट केलं नाही. बदली खेळाडू म्हणून त्याला मूळ किंमतीत संघात समाविष्ट केलं पाहिजे होतं.
“पण एजंट्सशी संपर्क झाल्यावर खेळाडू म्हणाला, जर जास्त पैसे मिळणार असतील तरच मी संघात येईन. कारण खेळाडूंना ठाऊक असतं की, पुढच्या हंगामात जर रिलीज झालो, तर लिलावात चांगले पैसे मिळतील. ब्रेविसचीही कल्पना अशीच होती, जास्त पैसे मिळाले तर खेळायचं, नाहीतर पुढच्या हंगामात लिलावात नाव द्यायचं. CSK जास्त पैसे द्यायला तयार होती, म्हणून तो या संघात सामील झाला.” आर अश्विनच्या या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण आलं. यानंतर आता चेन्नई सुपर किंग्सने पोस्ट शेअर करत त्याला संघात सामील करणं, हे नियमांनुसार असल्याचं सांगितलं.