वृत्तसंस्था, मुंबई क्रिकेटचे माहेरघर इंग्लंडला मागे टाकत आता क्रिकेटचे मुख्य केंद्र बनलेल्या भारतात क्रिकेटच्या महासोहळय़ाला म्हणजेच एकदिवसीय विश्वचषकाला आज, गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. सलामीच्या लढतीत गतविजेता इंग्लंड आणि गतउपविजेता न्यूझीलंड हे संघ एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. ट्वेन्टी-२० क्रिकेटची वाढती लोकप्रियता, गेल्या काही काळात कसोटी क्रिकेटला लाभलेली नवसंजीवनी यामुळे एकदिवसीय क्रिकेटचे महत्त्व कमी होत असल्याची भीती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी), आजी-माजी खेळाडू आणि चाहत्यांमध्ये आहे. अशा वेळी क्रिकेटवेडय़ा भारतात विश्वचषक स्पर्धा आयोजित होणे, हे एकदिवसीय क्रिकेटच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरू शकेल. आशिया चषक आणि आशियाई क्रीडा स्पर्धा यांच्यापाठोपाठ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा होत असल्याने यंदा या स्पर्धेबाबत तितकीशी चर्चा झालेली नाही. मात्र, भारतामध्ये क्रिकेट स्पर्धेबाबत चर्चा होण्यासाठी एक सामनाही पुरेसा ठरतो. इंग्लंड आणि न्यूझीलंड या तुल्यबळ संघांतील सामना अपेक्षेप्रमाणे चुरशीचा झाला, तर विश्वचषकाबाबत चाहत्यांमध्ये असलेली उत्सुकता निश्चित वाढेल. हेही वाचा >>>World Cup 2023: वर्ल्डकप २०२३पूर्वी आर. अश्विनचे आश्चर्यचकित करणारे विधान; म्हणाला, “गंभीरला जेवढे श्रेय हवे होते…” २०११ नंतर प्रथमच भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. त्यावेळी भारताने सह-यजमानपद भूषवतानाच विश्वचषकाचे जेतेपद मिळवले होते. मात्र, त्यानंतरच्या १२ वर्षांत भारताला ‘आयसीसी’ची केवळ एक (२०१३मध्ये चॅम्पियन्स करंडक) जागतिक स्पर्धा जिंकता आली आहे. २०११मध्ये भारतीय संघ विजयी ठरल्यानंतर २०१५मध्ये ऑस्ट्रेलिया आणि २०१९मध्ये इंग्लंडने मायदेशात एकदिवसीय विश्वचषकाचे जेतेपद मिळवले होते. आता यजमान भारताचा संघही या स्पर्धेवर वर्चस्व गाजवणार का आणि गेल्या दशकभरापासूनचा जागतिक जेतेपदाचा दुष्काळ संपवणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. भारताला गतविजेते इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या संघाकडून आव्हान मिळणे अपेक्षित आहे. यंदाच्या स्पर्धेत भारतीय खेळपट्टय़ांवर फलंदाजांकडून आक्रमकता अपेक्षित आहे. त्यामुळे गोलंदाजांची निश्चित कसोटी लागेल. अशात ज्या संघाचे गोलंदाज आपला खेळ उंचावतील, त्यांना विजयाची अधिक संधी निर्माण होईल. हेही वाचा >>>ENG vs NZ Live Streaming: न्यूझीलंड-इंग्लंड सामन्याने वर्ल्डकप २०२३चे वाजणार बिगुल; कधी, कुठे पाहणार लाइव्ह स्ट्रिमिंग? जाणून घ्या २०१९च्या स्पर्धेप्रमाणे यंदाच्या विश्वचषकातही १० संघांचा समावेश असून सर्व संघ एकमेकांविरुद्ध साखळी सामने खेळतील. साखळी सामन्यांअंती गुणतालिकेत अव्वल चार स्थानांवर असणारे संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. त्यानंतर अंतिम सामनाही अहमदाबाद येथे १९ नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. मात्र, त्यापूर्वीच्या सामन्यांत सर्वच संघांमध्ये चुरस असेल हे निश्चित.