मैदानावरील सामन्यादरम्यान कधीकधी खेळाडू एकमेकांशी भांडतात, परंतु सामना संपला की हे भांडणही संपते. कधीकधी हे भांडण बराच काळ टिकते. अशाच एका गोष्टीचा खुलासा माजी भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने केला. ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनने २-३ वर्ष का संवाद साधला नाही, याचा खुलासा उथप्पाने केला. २००७नंतर जेव्हा भारत-ऑस्ट्रेलिया मालिका खेळली जात होती, तेव्हा खूप स्लेजिंग होत होती, असे उथप्पाने सांगितले.

२००७मध्ये पहिल्या टी-२० वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. यानंतर टी-२० आणि एकदिवसीय मालिकाही भारताने नावावर केल्या. एका यूट्यूब चॅनलवर बोलताना उथप्पा म्हणाला, की टी-२० वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत दोन्ही संघांमधील स्लेजिंगची लढाई सुरू झाली. जेव्हा ऑस्ट्रेलियन लोक टिंगल करीत होते, तेव्हा काही लोकच त्याला प्रतिसाद देत होते. झहीर खान त्यापैकी एक होता, पण कोणत्याही फलंदाजाने त्याला उत्तर दिले नाही.

उथप्पा म्हणाला, ”मी अँड्र्यू सायमंड्स, मिचेल जॉन्सन आणि ब्रॅड हेडन यांना लक्ष्य केले. हेडनचा सामना करणे मला सर्वात कठीण वाटले कारण हेडनने मला एक माणूस आणि फलंदाज म्हणून प्रेरित केले. मला हे चांगले आठवते, की त्या सामन्यादरम्यान जेव्हा मी फलंदाजी करत होतो, तेव्हा हेडन स्लेज करीत होता, म्हणूनच मीसुद्धा असे करण्याचा निर्णय घेतला आणि हेडन जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा मी स्लेजिंग केले.”

या सामन्यात उथप्पा हेडनबाबत बोलतच राहिला. या गोष्टीमुळे हेडनने उथप्पाशी २-३ वर्षे अबोला धरला. या गोष्टीमुळे उथप्पाचे बरेच नुकसान झाले. उथप्पाने हे सर्व सामना जिंकण्यासाठी केले. हेडनला अधिक अस्वस्थ करणे हे त्याचे काम होते, संघ जिंकला, परंतु हेडनबरोबर त्याचे संबंध काही काळ बिघडले होते.