Nations League Cup Portugal vs Spain: पोर्तुगालच्या फुटबॉल संघाने नेशन्स लीग कपचे विजेतेपद पटकावले आहे. रविवारी रात्री उशिरा खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात पोर्तुगालने स्पेनचा पेनल्टी शूटआउटमध्ये ५-३ असा पराभव केला. अतिरिक्त वेळ संपल्यानंतर गुण २-२ असे बरोबरीत होते. यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाने विजय मिळवला आणि यानंतर कर्णधार रोनाल्डो ओक्साबोक्शी रडताना दिसला.

आयपीएल २०२५ मध्ये आरसीबीने १८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. या स्पर्धेचं जेतेपद पटकावल्यानंतर विराट कोहली थेट मैदानातच बसून ओक्साबोक्शी रडताना दिसला होता. आता रोनाल्डोनेदेखील याचप्रमाणे पोर्तुगाल संघाच्या विजयाचा आनंद साजरा केला आहे. याचे फोटो, व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहेत. विराट आणि रोनाल्डोच्या सेलिब्रेशनचे फोटो चाहते सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

२०२५ पूर्वी २०१८-२०१९ मध्येही पोर्तुगालने स्पर्धेच्या पहिल्या हंगामात हे जेतेपद जिंकले होते. सामन्याची अतिरिक्त वेळ संपल्यानंतरही सामना बरोबरीत होता. त्यानंतर पेनल्टी शूटआउटमध्ये पोर्तुगालने पाचही शॉटवर गोल केला, तर स्पेनच्या संघाने एक शॉट चुकवला. पोर्तुगालचा गोलकीपर डिएगो कोस्टा हिरो ठरला. त्याच्या एका सेव्हमुळे पोर्तुगालला नेशन्स लीगचे विजेतेपद मिळाले.

अंतिम सामन्याची सुरुवात पोर्तुगालसाठी चांगली झाली नाही. २१ व्या मिनिटाला स्पेनच्या मार्टिन झुबीमेंडीने गोल करून संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, स्पेनचा संघ ही आघाडी जास्त काळ टिकवू शकला नाही. २६ व्या मिनिटाला नुनो मेंडेसने गोल करून बरोबरी साधली.

हाफ टाईमपूर्वी, स्पेनच्या मिकेल ओयारझाबेने गोल करून स्पेनला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर, ६१ व्या मिनिटाला रोनाल्डोने गोल करून २-२ अशी बरोबरी साधली. त्यानंतर, पूर्ण वेळे होईपर्यंत सामना बरोबरीत राहिला. त्यानंतर सामना ३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेत गेला. त्यातही एकही गोल झाला नाही. त्यानंतर सामना पेनल्टी शूटआउटमध्ये गेला.

पेनल्टी शूटआउटमध्ये काय घडलं?

पोर्तुगालसाठी पहिल्याच शॉटवर गोंझालो रामोसने गोल केला. पोर्तुगाल १-० स्पेन

स्पेनसाठी पहिल्याच शॉटवर मिकेल मेरिनोने गोल केला. स्कोर पोर्तुगाल १-१ स्पेन

पोर्तुगालसाठी विटिन्हाने दुसरा गोल केला. पोर्तुगाल २-१ स्पेन

स्पेनसाठी अ‍ॅलेक्स बेनाने दुसरा गोल केला. पोर्तुगाल २-२ स्पेन

पोर्तुगालसाठी ब्रुनो फर्नांडिसने तिसरा गोल केला. पोर्तुगाल ३-२ स्पेन

स्पेनकडून इस्कोने तिसरा गोल केला. पोर्तुगाल ३-३ स्पेन

पोर्तुगालकडून नुनो मेंडेसने चौथा गोल केला. पोर्तुगाल ४-३ स्पेन

स्पेनकडून अल्वारो मोराटा चौथा गोल करण्यासाठी आला पण गोल करू शकला नाही. पोर्तुगाल ४-३ स्पेन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोर्तुगालसाठी पाचवा आणि शेवटचा गोल रुबेन नेव्हसने केला. पोर्तुगाल ५-३ स्पेन