IPL 2020साठी युएईत दाखल झालेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील एकूण १३ ते १४ जणांना करोनाची लागण झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. वेगवान गोलंदाज दीपक चहर, नवखा खेळाडू ऋतुराज गायकवाड आणि इतर काही कर्मचारी वर्ग यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून दिपक चहरसह अन्य करोनाबाधितांना विलगीकरण कक्षात हलवण्यात आलं असून त्यांना आपला क्वारंटाइन कालावधी पूर्ण करुन, करोना निगेटिव्ह असल्याचा अहवाल घेऊनच परत संघात दाखल होता येणार आहे.
दीपक चहरचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला त्याची बहिण मालती हिने धीर दिला आहे. तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर दीपकचा एक फोटो शेअर करत त्याला संदेश दिला आहे. “तू एक सच्चा लढवैय्या आहेस. तू जन्मापासून लढाऊ वृत्तीचा आहेस. अंधाऱ्या रात्रीनंतरचा दिवस हा कायमच जीवन प्रकाशमान करतो. तू देखील या आजारातून दुप्पट जोमाने पुनरागमन करशील याची आम्हाला खात्री आहे. पुन्हा चेन्नई सुपर किंग्जच्या सिंहाची गर्जना ऐकण्यासाठी आम्ही सारेच उत्सुक आहोत”, असे तिने ट्विट केले.
You are a true warrior, born to fight
Day is brighter after the darkest night
May you come out stronger than ever before
With love & prayers, waiting to see you roar.
(To all csk family)#IPL2020 pic.twitter.com/YFuBfp0E5Q
— Malti Chahar(@ChaharMalti) August 29, 2020
दरम्यान, १९ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या स्पर्धेला कोणताही धोका नसल्याचं BCCIमधील सूत्रांनी सांगितलं असलं तरीही या कारणामुळे स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. “योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. सध्या तरी स्पर्धेला कोणताही धोका नाही. पण सध्या घडत असलेल्या घडामोडींमुळे वेळापत्रकाची घोषणा काही काळ उशिराने करण्यात येईल”, अशी माहिती BCCIमधील सूत्रांनी दिली आहे.
दुबईत दाखल झालेल्या चेन्नई सुपरकिंग्जच्या खेळाडूंनी BCCIच्या सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं उल्लंघन केल्याचं बोललं जातंय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत चेन्नईचे खेळाडू हॉटेलमध्ये पोहचल्यानंतर स्थानिक व्यक्तीसोबत हात मिळवून त्याची गळाभेट घेताना दिसत होते. त्यामुळे आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.