बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्रा सहभागी होऊ शकला नाही, याची सर्वांना खंत होती. नीरज स्पर्धेमध्ये असता तर भारताचे भालाफेकीमधील पदक नक्की होते. मात्र, नीरजची अनुपस्थिती एका शेतकऱ्याच्या मुलीने भरून काढली आहे. स्पर्धेच्या १०व्या दिवशी अनु राणीने भालाफेकीमध्ये कांस्य पदक जिंकून इतिहास घडवला. या खेळात पदक जिंकणारी अनु राणी ही भारतातील पहिली महिला खेळाडू ठरली आहे.

अनु राणीने तिसर्‍या प्रयत्नात ६० मीटर अंतरावर भालाफेकला. त्यामुळे तिने पदक पटकावण्यात यश आले. यावेळी तिने ऑस्ट्रेलियाच्या विश्वविजेत्या केल्सी ली बार्बर आणि मॅकेन्झी लिटिल यांच्याशी स्पर्धा केली. अनुने नीरज चोप्राच्या अनुपस्थितीमध्ये देशाला एकमेव पदक मिळवून दिले. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, तिच्या पदक मिळवण्यामागची मेहनत आणि संघर्ष फार मोठा आहे. एखाद्या बॉलिवुड चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे तिची गोष्ट आहे.

मेरठजवळील एका खेडेगावात राहणाऱ्या सामन्य शेतकरी कुटुंबात अनूचा जन्म झाला. तीन बहिणी आणि दोन भावांमध्ये ती सर्वात लहान आहे. तिचा मोठा भाऊ उपेंद्र कुमार हा देखील धावपटू होता. त्याने विद्यापीठ स्तरावरील स्पर्धांमध्येही भाग घेतला होता. आपल्या भावाला बघून अनूच्या मनात खेळांविषयी प्रेम निर्माण झाले.

मात्र, आर्थिक स्थितीमुळे तिचे वडील तिला मदत करू शकत नव्हते. यावर पर्याय म्हणून तिने ‘देसी जुगाड’ वापरला. तिने भालाफेकीच्या सरावासाठी खऱ्या भालाऐवजी ऊसाचा वापर केला. आपल्या बहिणीची क्षमता ओळखून उपेंद्र कुमारने तिला घरापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘गुरुकुल प्रभात आश्रमा’मध्ये नेले. तिथे ती आठवड्यातील तीन दिवस भालाफेकीचा सराव करू शकत होती. याशिवाय उपेंद्रने तिच्यासाठी स्वत:चा खेळही सोडून दिला. त्याने वर्गणी गोळा करून तिच्यासाठी बूटही खरेदी केले होते.

हेही वाचा – CWG 2022: भारताची पोरं हुश्शार! मुलींच्या तुलनेत पटकावली जास्त पदकं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेक संकटांवर मात करून अनू राणीने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत देशासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तिच्या पूर्वी राष्ट्रकुल स्पर्धेत काशिनाथ नायक (२०१०) आणि नीरज चोप्रा (२०१८) यांनीच भालाफेकीमध्ये पदक मिळवलेले होते. अनु राणी आता राष्ट्रकुल स्पर्धेत भालाफेकीमध्ये पदक मिळवणारी पहिली महिला आणि तिसरी भारतीय ठरली आहे.