इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट

सलग दुसऱ्या विजयासाठी दिल्ली कॅपिटल्स-चेन्नई सुपर किंग्जमध्ये चढाओढ

अनुभवी यष्टीरक्षक व भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि त्याचा वारसदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युवा ऋषभ पंत यांच्यात मंगळवारी जुगलबंदी रंगणार आहे. इंडियन प्रीमियर क्रिकेट लीगच्या (आयपीएल) आपापल्या पहिल्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघांना धूळ चारणारे चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत.

दिल्लीच्या फिरोज शाह कोटलावर हा सामना रंगणार असून मुंबई इंडियन्ससारख्या बलाढय़ संघाला त्यांच्याच मैदानावर पराभूत केल्यामुळे कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील दिल्लीचा आत्मविश्वास फार उंचावला आहे. मुख्य म्हणजे पंतने मुंबईविरुद्ध तुफानी फटकेबाजी करत ७८ धावांची खेळी साकारल्यामुळे चेन्नईच्या गोलंदाजांना सावध राहावे लागेल. त्याशिवाय शिखर धवन व कॉलिन इन्ग्राम यांनादेखील सूर गवसला आहे. मात्र पृथ्वी शॉ आणि श्रेयस यांना कामगिरीत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. गोलंदाजीत कॅगिसो रबाडा, ट्रेंट बोल्ट, इशांत शर्मा हे वेगवान त्रिकूट दिल्लीच्या भात्यात आहे.

दुसरीकडे चेन्नईने गतविजेत्यांच्या थाटात स्पर्धेला सुरुवात करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुला पराभूत केले. दिल्लीची भिस्त ज्याप्रमाणे वेगवान त्रिकुटावर आहे, त्याउलट चेन्नईकडे तितक्याच तोडीचे फिरकी त्रिकूट आहे. हरभजन सिंग, इम्रान ताहीर व रवींद्र जडेजा या तिघांनी मिळून पहिल्या सामन्यात एकूण आठ बळी मिळवले.

मात्र कोटलाची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना पोषक असल्याने या तिघांना अंतिम ११ खेळाडूंत स्थान मिळते का, हे पाहणे रंजक ठरेल. धोनीला यावेळी फलंदाजीची संधी मिळण्याची शक्यता असून शेन वॉटसन व अंबाती रायुडू या सलामीवीरांना यावेळी अधिक मुक्तपणाने खेळण्याची आवश्यकता आहे. एकंदर या सामन्यात युवांचा जोश अनुभवापुढे फिका ठरणार का, याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

संघ

* चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सुरेश रैना, अंबाती रायुडू, शेन वॉटसन, फाफ डय़ू प्लेसिस, मुरली विजय, केदार जाधव, ड्वेन ब्राव्हो, कर्ण शर्मा, इम्रान ताहीर, हरभजन सिंग, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, मोहित शर्मा, के आसिफ, डेव्हिड विली, दीपक चहर, एन जगदीशन, सॅम बिलिंग्स, रवींद्र जडेजा, ध्रुव शोरे, चैतन्य बिश्नोई, ऋतुराज गायकवाड.

* दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कॉलिन इन्ग्राम, मनजोत कालरा, पृथ्वी शॉ, शेरफाने रुदरफोर्ड, शिखर धवन, अमित मिश्रा, आवेश खान, बंडारु अयप्पा, हर्षल पटेल, इशांत शर्मा, कॅगिसो रबाडा, नाथू सिंग, संदीप लामिछाने, ट्रेंट बोल्ट, अक्षर पटेल, ख्रिस मॉरिस, कॉलिन मुन्रो, हनुमा विहारी, जलाज सक्सेना, किमो पॉल, राहुल तेवतिया, अंकुश बेन्स.

* सामन्याची वेळ : रात्री ८ वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १