देवधर चषकात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारत क संघाने ब संघावर मात करुन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. अजिंक्य रहाणेने या सामन्यात नाबाद १४४ धावा पटकावून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. भारत ब संघ आपल्याला मिळालेलं आव्हान पूर्ण करु शकला नाही, आणि २९ धावांनी भारत क संघाने विजय मिळवला. मात्र या सामन्यादरम्यान एक मजेशीर प्रसंग पहायला मिळाला.
अवश्य वाचा – देवधर चषक : भारत क संघ ‘अजिंक्य’; कर्णधार रहाणेचं धडाकेबाज शतक
इशान किशन माघारी परतल्यानंतर शुभमन गिलच्या साथीने रहाणे फलंदाजी करत होता. शाहबाज नदीमच्या गोलंदाजीवर रहाणेने एक धाव काढली, याचवेळी मैदानातील स्कोअरबोर्डवर रहाणेने १०० धावा केल्याचं जाहीर करण्यात आलं. हे पाहताच अजिंक्यने सेलिब्रेशन करत आपल्या सहकाऱ्यांना बॅट उंचावून दाखवली. मात्र प्रत्यक्षात मैदानावरील स्कोअरबोर्डमध्ये चूक झाली होती ही बाब त्याच्या लक्षात आली नाही. टेलिव्हीजन सेटवर अजिंक्यच्या ९७ धावा झाल्या होत्या. यावेळी अजिंक्यचा सहकारी सुरेश रैनाने ड्रेसिंग रुममधून हाताची ३ बोटं उंचावत, अजुन शतकासाठी ३ धावा शिल्लक असल्याचा इशारा केला. यानंतर मैदानात सुरु असलेला हा गोंधळ अखेर थांबला. हा मजेशीर प्रसंग बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे.
What happened there? @ajinkyarahane88 felt he got to a 100, @ImRaina was quick to rectify there were 3 more runs to go pic.twitter.com/qi5RaMF8t8
— BCCI Domestic (@BCCIdomestic) October 27, 2018
प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या भारत ब संघाची सुरुवात चांगली झाली नाही. फॉर्मात असलेला मयांक अग्रवाल अवघ्या १४ धावांवर गारद झाला. यानंतर ऋतुराज गायकवाड आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करुन संघाचा डाव सावरला. ऋतुराज गायकवाडने ६० धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र गायकवाड माघारी परतल्यानंतर भारत ब संघाच्या मधल्या फळीने पुरती निराशा केली. दुसऱ्या बाजूने कर्णधार श्रेयस अय्यरने संघाची बाजू लावून धरत शतक झळकावलं. श्रेयसच्या खेळीमुळे भारत ब संघाने ३०० धावांचा टप्पाही ओलांडला, मात्र संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. १४८ धावांवर श्रेयस अय्यरला दिपक चहरने माघारी धाडलं. यानंतर बाकीच्या फलंदाजांनी फारशी लढत न देता शरणागती पत्करली आणि भारत क संघाने २९ धावांनी सामन्यात विजय संपादन केला.