India vs South Africa, Dhruv Jurel: भारतीय संघातील यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याला जेव्हा जेव्हा संधी मिळाली आहे, त्याने संधीचं सोनं केलं आहे. काही दिवसांपूर्वी वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने दमदार शतक झळकावलं होतं. आता भारत अ दक्षिण आफ्रिका अ या दोन्ही संघांमध्ये अनधिकृत कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतही ध्रुव जुरेलच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यातील दोन्ही डावात त्याने शतकी खेळी केली आहे. त्यामुळे त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत संधी मिळू शकते, हे जवळजवळ निश्चित झाले आहे.
ध्रुव जुरेल हा यष्टिरक्षक फलंदाज आहे. आतापर्यंत त्याला ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जात होते. पण आता ऋषभ पंत संघात असूनही त्याला मुख्य फलंदाज म्हणून संघात स्थान दिले जाऊ शकते. त्याला साई सुदर्शनच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर किंवा नितीश कुमार रेड्डीच्या जागी खालच्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळू शकते.
ध्रुव जुरेलचं लागोपाठ दुसरं शतक
दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध सुरू असलेल्या अनधिकृत कसोटी मालिकेत ध्रुव जुरेलला मुख्य फलंदाज म्हणून संघात स्थान दिले गेले आहे. या संधीचा त्याने चांगलाच फायदा घेतला आहे. तर ऋषभ पंत कर्णधारासह यष्टिरक्षकाच्या भूमिकेत होता.
ध्रुव जुरेलने आपल्या देशांतर्गत क्रिकेटमधील हंगामाला दमदार सुरुवात केली आहे. ठाणे आतापर्यंत १४०,१, ५६, १२५, ४४, ६, १३२ आणि १२७ धावांची खेळी केली आहे. गेल्या ८ डावात फलंदाजी करताना ३ शतक आणि १ अर्धशतक झळकावलं आहे. त्यामुळे भारतीय संघ त्याच्या या फॉर्मचा चांगला वापर करून घेऊ शकतो. ध्रुव जुरेलला आतापर्यंत ७ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने १ शतक आणि १ अर्धशतकासह ४३० धावा केल्या आहेत.
