बंगळूरु : पंचांच्या निर्णयाविरुद्ध दाद मागणे (डीआरएस) या पद्धतीमधील ‘अंपायर्स कॉल’ हा नियम विश्वचषक स्पर्धेत नव्याने चर्चेत आला आहे. यावरून क्रिकेटप्रेमी आणि क्रिकेटपंडित यांच्यात मतमतांतरे दिसून येऊ लागली आहेत.
स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा अखेरचा फलंदाज तबरेझ शम्सी हा हॅरिस रौफच्या गोलंदाजीवर पायचीत होता. खेळाडूंनी मैदानावरील पंचांनी विनंती फेटाळल्यावर तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली. त्यावेळी चेंडू योग्य टप्प्यावर आणि दिशेवर पडल्याचे तसेच यष्टय़ांवर आदळत असल्याचे स्पष्ट दिसून आले. तरी तिसरा पंच यावर निर्णय घेऊ शकले नाहीत. त्यांनी ‘अंपायर्स कॉल’ असा पर्याय देत शम्सी नाबाद असल्याचेच सांगितले.
हेही वाचा >>> युद्धविरामाच्या ठरावावर भारत तटस्थ; दहशतवादाच्या विरोधाची भूमिका घेत मतदानास अनुपस्थिती
या निर्णयानंतर सर्वप्रथम हरभजन सिंगने ‘आयसीसी’ने अशा अर्थहीन नियमाचा फेरविचार करावा, असे ‘ट्वीट’करून या चर्चेला वाचा फोडली. पुढे ग्रॅमी स्मिथ, हर्ष भोगले, मिस्बाह-उल-हक अशा प्रत्येकाने या चर्चेत उडी घेतली.
‘अंपायर्स कॉल’च्या नियमाबाबत फेरविचार करण्याचे सुचवितानाच हरभजनने खराब पंचगिरी आणि चुकीच्या निर्णयाने पाकिस्तान हरले, असे मत मांडले. चेंडू जर यष्टय़ांवर आदळताना दिसतो आहे, तर अशा वेळी मैदानावरील पंचाने बाद दिले काय किंवा नाबाद ठरवले काय, काही फरक पडत नाही. मग, तंत्रज्ञानाची मदत का घ्यायची? असा प्रश्नही हरभजनने उपस्थित केला.
यावर ‘आयसीसी’ पदाधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्याने या क्षणी हा नियम बदलणे शक्य नसल्याचे सांगितले. तिसऱ्या पंचाचे मख्य कार्य हे पंचाची भूमिका कमी करणे किंवा बदलण्याचे नसून, त्यांच्या चुका सुधारण्याचे आहे. तंत्र आणि अंदाज याची सांगड घालताना या पद्धतीत गेल्या काही वर्षांत अनेक बदल करण्यात आले आहेत, असे हा पदाधिकारी म्हणाला. रौफचा चेंडू अचूक टप्पा आणि दिशेने पडला होता. पण, तो यष्टय़ांवर आदळताना नियमाप्रमाणे ५० टक्के नव्हता. त्यामुळे येथे शम्सी नाबाद ठरतो, असे एका पंचाने सांगितले. गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून हा निर्णय निराशाजनक असू शकतो. पण, हा खेळाचा एक भाग झाला, असेही या पंचाने सांगितले.