ओव्हल कसोटीत सुरू असलेला भारत-इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना रंगतदार अवस्थेत आहे. चौथ्या दिवशी भारताने दुसऱ्या डावात ४६६ धावा केल्या. त्यानंतर रोरी बर्न्स आणि हसीब हमीद यांनी दमदार सलामी दिली. पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी २९१ धावा हव्या आहेत. बर्न्स आणि हमीद यांनी १०० धावांची सलामी दिल्यानंतर वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने बर्न्सला माघारी धाडले. त्यानंतर अजून विकेट्सच्या शोधात असलेल्या टीम इंडियाने पहिल्या सत्रात मोठी चूक केली.

अर्धशतक करून खेळपट्टीवर स्थिरावलेल्या हमीदला तंबूत धाडण्यासाठी टीम इंडियाकडे सुवर्णसंधी होती. ४८वे षटक फिरकीपटू रवींद्र जडेजा टाकत होता. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर हमीदने समोर चेंडू खेळला. मोहम्मद सिराजने हमीदचा हा सोपा झेल सोडला. सिराजच्या केलेल्या चुकीनंतर जडेजाही नाराज झाला. वृत्त लिहिपर्यंत हमीद ६ चौकारांसह ६० धावांवर नाबाद आहे.

 

 

हेही वाचा – मौहम्मद कैफनं केलेेल्या मेसेजवर ऋषभ पंतचा ‘नो-रिप्लाय’; मेसेजमध्ये म्हणाला होता, की…

मुंबईकर अष्टपैलू शार्दूल ठाकूर (६० धावा) आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत (५०) यांनी रचलेल्या बहुमूल्य शतकी भागीदारीमुळे चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने इंग्लंडला ३६८ धावांचे लक्ष्य दिले. मात्र इंग्लंडच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात करून भारताला चोख प्रत्युत्तर दिल्यामुळे आज पाचव्या दिवशी कोणता संघ बाजी मारतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

भारताला संधी कारण…

भारत जिंकण्याची शक्यता अधिक असण्याचे कारण म्हणजे आकडेवारी. भारताने ३०० पेक्षा अधिक धावांचे लक्ष्य देऊन सामना गमावल्याची घटना एकदाच घडली आहे. ४४ वर्षांपूर्वी असे झाले होते. त्यानंतर भारताविरोधात कोणत्याही संघाला धावांचा ३५० पलीकडील टप्पा चौथ्या डावात गाठता आला नाही.