आयपीएल लिलावात मंगळवारी कोटीच्या कोटी उड्डाणं पाहायला मिळाली पण काहींच्या नशिबी ‘अनसोल्ड’चा शिक्का बसला. इंग्लंडचा युवा सलामीवीर फिल सॉल्ट यापैकीच एक. अनसोल्ड जाण्याचा सल मनात ठेऊन काही तासात सॉल्टने वेस्ट इंडीजविरुध्द ५७ चेंडूत ११९ धावांची वादळी खेळी केली. सॉल्टच्या या खेळीत तब्बल १० षटकार आणि ७ चौकारांचा समावेश होता.

सलग दोन ट्वेन्टी२० लढतीत शतकी खेळी साकारणारा सॉल्ट केवळ तिसरा फलंदाज आहे.

योगायोग म्हणजे आयपीएल लिलावाआधी झालेल्या लढतीततही सॉल्टने अशीच तडाखेबंद शतकी खेळी साकारली होती. सॉल्टने १६ डिसेंबर रोजी झालेल्या लढतीत ५६ चेंडूत १०९ धावांची आक्रमक खेळी केली होती. यामध्ये ९ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश होता.

या खेळीची दखल आयपीएल फ्रॅंचाईज घेतील अशी शक्यता होती पण लिलावात सॉल्टला संघात घेण्यात कोणत्याही संघाने स्वारस्य दाखवलं नाही. त्याच्या नावावर अनसोल्डचा शिक्का बसला.

गेल्या वर्षी झालेल्या लिलावात दिल्ली कॅपिटल्स संघाने सॉल्टला २ कोटी रुपये खर्चून विकत घेतलं होतं. सॉल्टने ९ सामन्यात दिल्लीचं प्रतिनिधित्व केलं. पण यंदाच्या लिलावाआधी दिल्लीने सॉल्टला रिलीज केलं.

लिलावासाठी सॉल्टने बेस प्राईज १.५ कोटी इतकी ठेवली होती पण संघांनी त्याच्यासाठी उत्साह दाखवला नाही. सॉल्टच्या सलग दोन शतकांच्या बळावर इंग्लंडने ५ सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी केली आहे. पाचवा सामना २२ तारखेला होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२७वर्षीय सॉल्टने १९ वनडे आणि २० ट्वेन्टी२० सामन्यात इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं आहे. सॉल्ट ऑस्ट्रेलियातील बिग बॅश, पीएसएल यांच्यासह अनेक ट्वेन्टी२० लीगमध्ये नियमित खेळतो.