England Beat India and Qualified For Women’s World Cup 2025 Semifinal: भारतीय महिला संघाला वनडे वर्ल्डकप २०२५ मध्ये सलग तिसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. इंग्लंड महिला संघाने भारताच्या जबड्यातून विजय हिसकावून घेत अवघ्या ४ धावांनी पराभव केला. भारतीय संघाविरूद्धच्या विजयानंतर इंग्लंड संघ महिला वनडे विश्वचषक २०२५ च्या सेमीफायनमध्ये प्रवेश करणारा तिसरा संघ ठरला आहे. भारताकडून स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांनी शतकी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला होता, पण संघाला विजयापर्यंत नेण्यात मात्र अपयशी ठरले.

भारतानेही इंग्लंड संघाप्रमाणेच अखेरच्या षटकांमध्ये विकेट्स गमावले. त्यामुळे अखेरच्या षटकात भारताला विजयासाठी १४ धावांची गरज होती. पहिल्या तीन चेंडूत भारताने फक्त ३ धावा केल्या. तर चौथ्या चेंडूवर एकही धाव घेता आली नाही. अखेरच्या चेंडू चौकारासाठी गेला खरा पण तोपर्यंत सामना हातातून निसटला होता आणि परिणामी भारतीय संघावर इंग्लंडने ४ धावांनी विजय मिळवला.

इंग्लंडने दिलेल्या २८८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना प्रतिका रावल सुरूवातीलाच बाद झाली. यानंतर हरलीन देओलने काही कमालीचे फटके खेळले. पण हरलीनदेखील लवकर बाद झाली. यानंतर कर्णधार स्मृती मानधना आणि उपकर्णधार हरमनप्रीत कौरने उत्कृष्ट शतकी भागीदारी रचली.

भारताकडून स्मृती मानधनाने ९४ चेंडूत ८ चौकारांसह ८८ धावांची शानदार खेळी केली. तर कर्णधार हरमनप्रीत कौरने ७० चेंडूत १० चौकारांसह ७० धावांची खेळी केली. याशिवाय दीप्ती शर्मानेही अर्धशतक झळकावलं. भारताच्या फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करूनही अखेर भारताला सामन्यात पराभव पत्करावा लागला. इंग्लंडकडून एलिस कॅप्सी वगळता सर्व गोलंदाजांनी विकेट्स घेतल्या.

इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि ५० षटकांत ८ बाद २८८ धावा केल्या. इंग्लंडकडू टॅमी ब्यूमाँट आणि एमी जॉन्स यांनी चांगली सुरूवात केली. जॉन्सने ५६ धावा अर्धशतकी खेळी केली. तर हिथर नाईट हिने ९१ चेंडूत १५ चौकार आणि एका षटकारासह १०९ धावा केल्या. तर नॅट स्किव्हर ब्रंटसह तिने शतकी भागीदारी रचली. ही मोठी भागीदारी तोडल्यानंतर भारताने सामन्यात पुनरागमन केलं. भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर श्रीचरणी हिने २ विकेट्स घेतल्या.