नितीन तेंडुलकर

लहाणपणापासून सचिन उत्साही होता. आम्ही साहित्य सहवासात राहायचो, त्यावेळी त्याचा जास्तीत जास्त वेळ हा मैदानातच जात असे. त्याच्यातील हाच उत्साहीपणा त्याला क्रिकेटमध्ये कामी आला. सचिनला लहानपणापासून प्राण्यांची आवड होती. सुरुवातीला सचिन वांद्रे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये होता. त्यानंतर तो शारदाश्रममध्ये शिकला आणि तिथेच सचिन क्रिकेटपटू म्हणून घडला.

सचिनने जगभर नाव कमावले, पण त्यानंतरही तो बदलला नाही. तो जसा पूर्वी होता तसाच राहिला. तो घरातील सर्वाना मदत करत असे. सचिनला गाण्यांची प्रचंड आवड होती. आम्ही गाणी मोठय़ा आवाजात लावायचो आणि लोकांचा कळायचे की सचिन दौरा करून परतला आहे. त्यावेळी रात्री उशिरा आजी आम्हाला चहा करून द्यायची.

सचिन खवय्यादेखील आहे. त्याला वेगवेगळे पदार्थ खाण्यास आवडतात. वांद्रे येथे मिळणारी चिकन बिरयाणी त्याला विशेष पसंत होती. यासह आईने केलेली वांग्याची भाजी, अळूची भाजी तो आवडीने खायचा. एकदा तो मित्राच्या घरून भेंडीची भाजी खाऊन आला आणि आम्हाला बेडकाची भाजी खाऊन आल्याचे त्याने सांगितले. आम्ही थोडे गोंधळलो, पण नंतर त्याने नक्की काय खाल्ले ते आम्हाला समजले. वडापाव हा त्याचा सर्वात पसंतीचा पदार्थ. मासेही तो आवडीने खातो. मात्र, ‘डाएट’वर असताना तो खाण्याबाबत कडक नियम पाळायचा.

सचिन गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने आत्मसात करतो. क्रिकेट खेळणे हे त्याच्या आयुष्यातील अंतिम ध्येय होते. लहानपणी तो अतिशय लाजाळू होता. टॉम ऑल्टरसोबतच्या पहिल्या मुलाखतीत सचिन फार काही बोलला नव्हता. परंतु आपल्याला या पुढेही अनेक मुलाखती द्याव्या लागणार असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने आत्मविश्वास वाढवला आणि धीटपणे सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास सुरुवात केली.

परदेश दौऱ्यातील एक किस्सा सांगयचा झाल्यास एका दौऱ्यात भारतीय फलंदाजांना खेळपट्टीवर टिकाव धरणे कठीण जात होते. त्यावेळी सचिनला जाणवले की आपण बॅटची ‘ग्रीप’ बदलली तर फायदा होईल. त्याने तसे केले आणि शतक झळकावले. सचिन फार कमी वयात प्रगल्भ झाला.
निवृत्तीनंतरही सचिन पूर्वीइतकाच व्यग्र आहे, असे म्हणायला हरकत नाही. दिवसभरात त्याला वेळ मिळणे तसे सोपे नसते. जेथे सचिन सध्या राहतो, तेथे तळालाच त्याचे कार्यालय आहे. त्याला वेळ आहे का, हेदेखील आम्हाला त्याच्या व्यवस्थापकाला विचारावे लागते. त्याने आतापर्यंत आपले समाजसेवेचे कार्य कुठलाही गाजावाजा न करता सुरू ठेवले आहे. त्याने आजवरच अनेक गावांच्या विकासात हातभार लावला आहे. करोनाकाळातही त्याने सर्वतोपरी योगदान दिले. अशा पद्धतीने सचिन आपले सामाजिक भान जपून आहे. यासह ‘आयपीएल’मध्ये मुंबई इंडियन्स संघाच्या प्रेरकाच्या भूमिकेत आहे. त्यामुळे क्रिकेटसोबतचे त्याचे नाते अजूनही अतूट आहे. मात्र, यामधूनही वेळ काढून सचिन आपल्या कुटुंबीयांना वेळ देतो, हे विशेष.

कुटुंबवत्सल आणि खवय्या सचिन!

सचिनचा काळ होता, तो म्हणजे नव्वदीचा. सचिनला कुठे मिसुरडे फुटत होते, तोच तो भारतीय संघात दाखल झाला. हा मुलगा काय करेल, असे अनेकांनी म्हटले. सचिनचा पहिलाच दौरा पाकिस्तान होता. या दौऱ्यात वकार, वसीम व इम्रानसारखा तोफखाना सचिनसमोर होता. मात्र, सचिन डगमगला नाही. त्यानंतर सचिनने अनेक विक्रमांचे अनेक इमले रचले. मग, तो धावांचा असो की शतकांचा, त्या प्रत्येकाचे साक्षीदार क्रीडा पत्रकार होते. सचिनने देखील विक्रम रचल्यावर आवर्जून त्यांच्याशी संवाद साधला. सचिनने हे नाते जपले आणि ते अधिक वृिद्धगत केले. माझ्या जडणघडणीत कुटुंबियांचा प्रमुख वाटा असला, तरी माझ्या कामगिरीची दखल घेणाऱ्या पत्रकारांची भूमिकाही महत्त्वाची होती, असे सचिन म्हणतो.

अखेर प्रत्येकाच्या कारकीर्दीत जी वेळ आली, ती सचिनवरही आली. ती म्हणजे निवृत्त होण्याची. त्याच्या भावूक भाषणाने सर्वाना हुंदका आल्याशिवाय राहिला नाही. सर्व क्रीडा पत्रकारही तेव्हा इतरांप्रमाणेच गहिवरले होते. तो क्षण मन दाटून आणणारा होता. सचिन म्हणजे केवळ नाव नव्हते, तर क्रिकेटच्या २२ यार्डातील ती कधीही न संपणारी उर्जा होती. आजही मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर जेव्हा सामना होता, तेव्हा ‘सचिन.सचिन.’ असा जयघोष केल्याशिवाय कुणीच राहत नाही. सचिन सध्याच्या तारांकित भारतीय खेळाडूंचा प्रेरणास्थान आहे. सचिन नेहमीच सांगायचा की मला खंत आहे ती, ‘कारकीर्दीत विश्वचषक न जिंकल्याची.’ सचिनला त्यासाठी कारकीर्दीच्या उत्तरार्धापर्यंत प्रतीक्षा करावी. म्हणतात ना, संयमाचे फळ हे नेहमी चांगले असते. त्याचे फळ सचिनला मिळाले. २०११ साली वानखेडे स्टेडियमवर सचिनने विश्वचषक उंचावला. सर्वानी सचिनला आपल्या खांद्यावर घेतले होते. आताचा तारांकित विराट कोहली तेव्हा क्रिकेटमध्ये नवखा होता. जणू तो सांगत होता की ‘सचिन भाई आप अपनी जिम्मेदारी मुझको दे दिजीये.’ तेव्हा त्याने सचिनचे ते ओझे मोठय़ा जबाबदारीने पेलले.

यानंतर सचिनने शतकांचे शतक साजरे केले. निवृत्तीनंतरही सचिन तितकाच सक्रीय आहे. आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान त्याने जपले. ‘भारतरत्न’ सचिन देशातील प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या गळय़ातील ताईत आहे. दक्षिणेत अनेक अभिनेत्यांना देवाचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र, क्रिकेटचा एकमेव देव म्हणजे सचिन.

नुकताच आपल्या ५०व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सचिनने पत्रकारांशी संवाद साधला. त्यामुळे सचिनने क्रिकेटच्या प्रवासात पत्रकारांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले. सचिनने पत्रकारांकडून त्यांचेच किस्से एकले. सचिनने त्यांच्यासोबत जेवण केले. अनेक जुन्या आठवणी जागवल्या. सचिनवर चित्रपट येत आहे. क्रीडा पत्रकारांसाठी त्याचा वेगळा शो ठेवला होता. ज्या क्रिकेट क्लब ऑफ इंडियाकडून (सीसीआय) सचिनला खेळता यावे यासाठी क्रिकेट प्रशासक राजसिंह डुंगरपूर यांनी नियम बदलले होते, त्याच ‘सीसीआय’मध्ये पत्रकरांसोबत त्याची अनौपचारिक गप्पांची मैफल रंगली. ती संपू नये असे वाटत होते, कारण सचिनला इतका दिलखुलास कमीच पाहायला मिळते. त्याच्या वाढदिवसाची आठवण म्हणून सचिनने सर्वाना एक भेटही दिली.

अर्धशतकाचे शतकात रुपांतर करण्यात सचिनचा हातखंडा समजला जातो. आयुष्यातील अर्धशतकाचे रुपांतर सचिनने शतकात करावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना! सचिन तेंडुलकर! भारतातील क्रिकेटप्रेमींचा प्राण. जगभरातील क्रिकेटप्रेमींचा आदर्श. विक्रमादित्य सचिन तेंडुलकर येत्या सोमवारी, २४ एप्रिल रोजी ५० वर्षांचा होतोय. पाव शतकाच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक अर्धशतके, शतके ठोकणाऱ्या सचिनच्या आयुष्याचे अर्धशतक हीदेखील एक मैलखूणच. त्या निमित्ताने..