जगातील सर्वात मोठा फुटबॉलचा विश्वचषक अर्थात फिफा विश्वचषक यंदा कतारमध्ये खेळवला जात आहे.  बहुतांश देशात खेळला जाणारा खेळ म्हणजे फुटबॉल क्रिकेटच्या तुलनेतही अधिक प्रसिद्ध आहे. याच लोकप्रिय फुटबॉलच्या विश्वचषकाला काही तास शिल्लक राहिले असून यंदा हा विश्वचषक आखाती देशांपैकी एक कतार येथे पार पडत आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरात वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या देशांच्या संघांचे समर्थन करणाऱ्या गोष्टी बघायला मिळत आहेत.

फुटबॉल म्हटले की, वाड्यावस्त्या, चौकाचौकात, तालीम पेठांमध्ये ह्या खेळाची क्रेज दिसून येते मग ती स्थानिक लोकांपासून ते राष्ट्रीय संघातील खेळाडूंपर्यंत दिसून आली आहे. त्यात चार वर्षांनी येणाऱ्या फिफा विश्वचषकाची धुम रविवारी २० नोव्हेंबर पासून कतारमध्ये सुरू होत आहे. हा जगभरातील फुटबॉल चाहत्यांसाठी महत्त्वाचा क्षण आहे. मग त्यात महाराष्ट्राच्या कोल्हापुरातील शौकीन कसे मागे राहतील. भलेही भारताचा संघ नसला तरी येथील फुटबॉल चाहते ब्राझील, अर्जेंटिना, जर्मनी आणि पोर्तुगाल संघाला सर्वाधिक पसंती देत आहेत. त्याचे प्रतिबिंब गल्लीबोळातून दिसू लागले आहे. लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना), नेयमार (ब्राझील), क्रिस्तियानो रोनोल्डो (पोर्तुगाल) या खेळाडूंची शहराच्या प्रमुख चौकात कटआऊट, डिजिटल फलक आणि काही घरांच्या भितींही चाहत्यांनी रंगविल्या आहेत.

केरळ, बंगाल आणि गोवा या राज्यांप्रमाणेच कोल्हापुरात देखील फुटबॉलची प्रचंड क्रेझ बघायला मिळते. इथे तालीम आणि पेठांमध्ये अनेक फुटबॉल वेडे तरुण आहेत. सरदार तालीम परिसरात नेयमार जुनिअर फॅन्स क्लब यांच्या वतीने नेमार जूनियर खेळाडूचा जवळपास २० ते २५ फूट मोठा बॅनर एका इमारतीवर लावलेला आहे. मंगळवार पेठेतील गुलाब गल्लीमध्ये लिओनेल मेस्सी, क्रिस्टियानो रोनाल्डो यांच्या शेवटच्या वर्ल्ड कप साठी त्या खेळाडूंच्या सन्मानात त्यांचे फोटो असलेले पताके त्याचबरोबर त्यांच्या संघाचे झेंडे पताका स्वरूपात लावण्यात आले आहेत.

हेही वाचा :   FIFA World Cup 2022: २९ दिवस, ३२ संघ आणि एक चषक; २० नोव्हेंबर पासून कतारमध्ये रंगणार फिफा विश्वकरंडकाचा महासंग्राम

रंकाळा टॉवर परिसरात रंकाळा चौपाटी उद्यानाच्या कमानी शेजारी ब्राझील फॅन्सच्या वतीने नेयमार जुनिअर या खेळाडूचा अंदाजे १८ ते २० फुटांचा फ्लेक्स लावण्यात आला आहे. पाटाकडील तालीम मंडळाच्या गल्लीमध्ये ब्राझीलचा झेंडा हा पताका स्वरुपात अडकवण्यात आला आहे. तर मंडळाच्या शेजारील घराच्या बाल्कनीबाहेर ब्राझील संघातील खेळाडूंचे कट आउट्स लावले आहेत. आझाद चौकात लिओनेल मेस्सीचा जवळपास २५ फूट उंच क्यू आउट मेस्सी समर्थकांच्या वतीने उभा करण्यात आला आहे. सायबर कॉलेजच्या चौकात क्रिस्टियानो रोनाल्डो खेळाडूचा ३५ फुटांचा उंच कट आउट लावण्यात आला आहे. कोल्हापुरातील कट्टर क्रिस्टियानो समर्थक या ग्रुपच्या वतीने हा महाराष्ट्रातील सर्वात उंच कट आउट लावण्यात आल्याचे या ग्रुपचे सदस्य विराज पोतदार यांनी सांगितले.

जशी लॉर्डसला क्रिकेटची पंढरी म्हटली जाते तसे महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्याला फुटबॉलची पंढरी समजली जाते. कोल्हापूरकरांतील काही फुटबॉल चाहत्यांनी ब्राझीलला अर्थात पिवळ्या निळ्याला, तर काहींनी अर्जेटिना अर्थात निळ्या पांढऱ्या रंगाला पसंती दर्शविली आहे. त्यानुसार स्थानिक कोल्हापूरातील संघाच्या चाहत्यांनी यापूर्वीही ज्याला समर्थन दिले ते संघ विजयी झाले आहेत. फुटबॉल प्रेमापोटी स्थानिक फुटबॉल शौकीन ब्राझील जिंकू दे अथवा अर्जेंटिना, फटाक्यांची आतषबाजी करून फुटबॉल आनंद लुटतात.