भारताला क्रिकेटच्या इतिहासात पहिला विश्वचषक जिंकून देणारा १९८३ चा संघ आणि त्यावेळी घडलेल्या अनेक घटनांवर भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी भाष्य केलं आहे. तसेच या विश्वचषकात भारतीय संघासाठी टर्निंग पॉईंट कोणता ठरला यावरही त्यांनी थेट उत्तर दिलं. कुणाकडूनही पराभूत न झालेल्या वेस्ट इंडिज संघाचा भारताकडून पराभव आणि त्यानंतर भारतीय संघात आलेला आत्मविश्वास हा मोठा टर्निंग पॉईंट होता, असं कपिल देव यांनी सांगितलं. ते एबीपी वृत्तवाहिनीच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात बोलत होते.

कपिल देव म्हणाले, “विश्वचषक जिंकताना केवळ एकच टर्निंग पॉईंट नव्हता. पहिल्या सामन्यापासूनच टर्निंग पॉईंट सुरू झाले. वेस्ट इंडिजचा संघ त्याआधी कुणाकडूनही पराभूत झाला नव्हता. तेव्हा भारताचा संघ अगदी छोटा होता. वेस्ट इंडिज भारताकडून पराभूत झाला आणि त्यानंतर प्रत्येक सामन्यात काहीतरी घडत होतं. १९८३ चा विश्वचषक जिंकण्यातील भारतीय संघासाठी सर्वात मोठा ‘टर्निंग पॉईंट’ आत्मविश्वास आला तो होता.”

“त्या दिवशी संपूर्ण खेळ बदलला, नंतर मी कर्णधार नव्हतो”

“अनेकदा आपल्याला आपल्या क्षमतेचा अंदाज नसतो. कुणी चांगला गाऊ शकतो, कुणी चांगला लिहू शकतो तसंच भारतीय संघाला आपल्या संघात दम आहे हे विश्वास आला. त्या दिवशी संपूर्ण खेळ बदलला. त्याआधी मी कर्णधार होतो यात संशय नाही, पण त्या टर्निंग पॉईंटनंतर मी कर्णधार नव्हतो. त्यानंतर संपूर्ण संघच कर्णधार होता. जेव्हा संघ काहीतरी मिळवायचं आहे हे ठरवतो तेव्हा कुणीच थांबवू शकत नाही,” असं कपिल देव यांनी सांगितलं.

“मला ‘या’ दोनच गोष्टींचं दुःख वाटतं”

कपिल देव म्हणाले, “मला दोनच गोष्टींचं दुःख वाटतं. एक सुनिल वॉल्सन खेळू शकला नाही. इतक्या वर्षांनी मी त्याकडे पाहतो तर असं वाटतं की त्याला खेळवलं असतं तर तोही खेळू शकला असता. दुसरं दुःख होतं सुनिल गावसकर त्यावेळी ५० धावा करु शकला असते तर तेही चांगलं झालं असतं. या दोन गोष्टींमुळे फार दुःख झालं.”

हेही वाचा : सचिनचे विक्रम इतक्या लवकर कोणी मोडेल असं वाटलं नव्हतं, कपिल देवकडून विराटचं कौतुक

“सुनिल गावसकरसारखा एवढा मोठा खेळाडू त्याची कामगिरी इतकी कमी कशी असू शकते असं वाटलं. ४० वर्षांनी असं वाटतं की सुनिल वॉल्सनही खेळला असता तर चांगलं झालं असतं,” असंही कपिल देव यांनी नमूद केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.