‘आशिया कप’मधील सुपर ४ मध्ये पाकिस्तानविरोधातील सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीने भावूक होत अनेक खुलासे केले. यावेळी त्याने मी भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर केवळ महेंद्रसिंह धोनीने मला संदेश पाठवला, असा खुलासा केला. विराट कोहलीच्या या खुलाशानंतर त्याचा इशारा नेमका कोणाकडे आहे यासंदर्भात चर्चा सुरु असताना, भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. कोहलीने कोणाचंही नावे घेतले नसलं, तरी तो भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांच्याविषयी बोलत असल्याची शक्यता आहे. मला २० मिनिटं कोहलीला मार्गदर्शन करता आलं, तर फलंदाजीत कोणते बदल करावेत हे मी त्याला सांगू शकेन, असं गावस्कर एका मुलाखतीत म्हणाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गावसकरांची प्रतिक्रिया

“कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर विराटला ज्या खेळाडूकडून संपर्क अपेक्षित होता, त्याचं नाव त्याने सांगावं आणि तो कोणत्या संदेशाची वाट पाहत होता हे देखील स्पष्ट करावे. विराट नक्की कोणत्या माजी सहकाऱ्यांबद्दल बोलत आहे, हे सांगणं अवघड आहे. त्याने स्वत: त्या खेळाडूंची नावं सांगितली पाहिजेत,” असं सुनील गावसकर म्हणाले आहेत.

कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर केवळ धोनीचा संदेश -कोहली

“ड्रेसिंग रुममध्ये इतर खेळाडूंसोबत काय स्थिती होती याची मला कल्पना नाही. पण जर त्याने संपर्क साधलेल्या व्यक्तीचं नाव घेतलं, तर त्याने न साधणाऱ्यांचंही नाव घ्यायला हवं होतं. कोणीच संपर्क साधला नाही असं म्हणणं, यासंबंधी चिंता व्यक्त करणाऱ्यांवर अन्याय आहे,” असंही गावसकर यांनी ‘इंडिया टुडे’शी बोलताना म्हटलं आहे.

दरम्यान ‘स्पोर्ट्स तक’शी बोलताना त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. “नेमका त्याला कोणता संदेश द्यायचा आहे? पाठबळ? पण जर त्याने कर्णधारपद सोडलं होतं, तर मग त्याला त्याची गरज काय? तो विषय (कर्णधारपद) संपला आहे”.

कोहलीने गेल्या वर्षीच्या अखेरीस भारताच्या ट्वेन्टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्याला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरूनही काढण्यात आलं. मात्र, तो आणखी काही वर्षे कसोटी संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळत राहील अशी अपेक्षा होती. परंतु जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका गमावल्यानंतर कोहलीने अचानकपणे कसोटी संघाचे कर्णधारपदही सोडलं.

कोहलीने काय म्हटलं आहे?

गेल्या वर्षभरातील या घडामोडी, धावांसाठी झगडावे लागत असल्याने लोकांकडून होणारी टीका आणि धोनीशी संवाद, यावर कोहलीने रविवारी आशिया चषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर भाष्य केलं. ‘‘मी जेव्हा कसोटी संघाचे कर्णधारपद सोडलं, तेव्हा मला केवळ एका माजी सहकाऱ्याने संदेश पाठवला. तो सहकारी म्हणजे महेंद्रसिंह धोनी. अनेकांकडे माझ्या फोनचा क्रमांक आहे. अनेक जण टीव्हीवरून मला सल्ले देत असतात. मात्र, धोनी वगळता एकाही व्यक्तीने मला संपर्क केला नाही,’’ असे कोहली म्हणाला.

‘‘मला एखाद्या व्यक्तीला काही सांगायचे असल्यास मी थेट त्याच्याशी संपर्क साधेन. तुम्ही संपूर्ण जगासमोर मला काही सूचना करत असाल, तर त्याला फारसे महत्त्व नाही. तुमच्या सल्ल्यामुळे माझ्या खेळात सुधारणा होऊ शकेल असं वाटत असल्यास तुम्ही माझ्याशी थेट संवाद साधू शकता,’’ असं रोखठोक मतही कोहलीने व्यक्त केलं होतं.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former cricketer sunil gavaskar on virat kolhi saying except ms dhoni nobody messaged after leaving test captaincy sgy
First published on: 06-09-2022 at 10:53 IST