Ravi Shastri On Vaibhav Suryavanshi: भारतीय १९ वर्षांखालील फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. १४ वर्षीय भारतीय १९ वर्षांखालील संघासह इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंडविरूद्ध सुरू असलेल्या युथ वनडे सामन्यात त्याने धावांचा पाऊस पाडला आहे. ५ सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात त्याने ५२ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. हे या स्वरूपातील सर्वात वेगवान शतक असल्याचं म्हटलं जात आहे. या सामन्यात फलंदाजी करताना त्याने ७८ चेंडूंचा सामना करत १४३ धावांची तुफानी खेळी केली. या वादळी खेळीदरम्यान त्याने १० षटकार आणि १३ चौकार मारले. या खेळीनंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. दरम्यान भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी, वैभव सूर्यवंशी भारतीय संघात केव्हा पदार्पण करू शकतो, याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.
वैभव सूर्यवंशीबाबत बोलताना रवी शास्त्री म्हणाले, ” वैभव सूर्यवंशीला राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी येणाऱ्या काही वर्षात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करावी लागेल. त्यानंतर तो भारतीय संघाचा भाग बनू शकतो.”
वैभवने इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघाविरूद्ध फलंदाजी करताना दमदार फलंदाजी केली आहे. या मालिकेतील सुरुवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये त्याने ४८, ४५ आणि ८६ धावांची खेळी केली होती. आता चौथ्या सामन्यात त्याने वेगवान शतकी खेळी केली आहे. आपल्या फलंदाजीने लक्षवेधी कामगिरी करण्याची ही त्याची पहिलीच वेळ नाही. याआधी आयपीएल २०२५ स्पर्धेत त्याच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला होता. या स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना पहिल्याच सामन्यात त्याने षटकार मारून सुरूवात केली होती. त्यानंतर गुजरात टायटन्ससंघाविरूद्ध झालेल्या सामन्यात त्याने ३५ चेंडूत शतक झळकावलं होतं. या स्पर्धेत तो सर्वात वेगवान शतक झळकावणारा युवा फलंदाज ठरला होता. यासह आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वात जलद शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो ख्रिस गेलनंतर दुसऱ्या स्थानी आहे.
या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दमदार विजयाची नोंद केली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवत दमदार कमबॅक केलं. पुढील दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवत, मालिकेत ३-१ ने विजयी आघाडी घेतली आहे.