Asia Cup 2022: आशिया चषक स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच भारताने केला पाकिस्तानचा पराभव! बघा Video

IND vs PAK Asia Cup 2022: स्टार स्पोर्ट्ने आपल्या सोशल मीडियावर माजी खेळाडूंच्या सामन्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

Asia Cup 2022: आशिया चषक स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच भारताने केला पाकिस्तानचा पराभव! बघा Video
फोटो सौजन्य – स्टार स्पोर्ट्स

आशिया चषक २०२२ क्रिकेट स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. कट्टर प्रतिस्पर्धी असलेले भारत आणि पाकिस्तान हे दोन देश या स्पर्धेनिमित्त पुन्हा एकदा समोरासमोर येणार आहेत. आशिया चषक स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार २८ ऑगस्ट रोजी दोन्ही देशांचा सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी जोरदार वातावरण निर्मिती होत आहे. अशातच स्टार स्पोर्ट्सने शेअर केलेला एक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय क्रिकेट खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंचा पराभव केल्याचे दिसत आहे.

२७ ऑगस्टपासून यूएईमध्ये आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्यासाठी यूएईमध्ये जोरदार पूर्व तयारी आहे. स्पर्धा सुरू होण्याआधी सहभागी देशांतील काही माजी खेळाडू दुबईत दाखल झाले आहेत. स्पर्धेचे प्रसारण हक्क असलेल्या स्टार स्पोर्ट्सने या खेळाडूंना काही मजेशीर कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यानिमित्त भारत आणि पाकिस्तानचे प्रत्येकी तीन माजी खेळाडू एकमेकांच्या विरोधात एक ‘बॉल आउट’ सामना खेळताना दिसले. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ३-० असा पराभव केला.

‘बॉल आउट’ सामन्यामध्ये भारताकडून सुनील गावसकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी तर पाकिस्तानकडून रमीझ राजा, शोएब अख्तर आणि आमिर सोहेल यांनी सहभाग घेतला होता. भारतीय खेळाडूंनी तीन्ही चेंडू अचूक स्टंपवर मारले. याउलट पाकिस्तानच्या माजी खेळाडूंना एकही चेंडू स्टंपवर मारता आला नाही. त्यामुळे, २००७च्या टी २० विश्वचषकातील ‘बॉल आउट’ सामन्यात पाकिस्तानचा जसा पराभव झाला होता तशीच परिस्थिती आताही निर्माण झाली.

हेही वाचा – Asia Cup 2022: “मला सौरव गांगुलीच्या बरगड्यांवर चेंडू फेकण्यास सांगितलं होतं”; पाकिस्तानच्या गोलंदाजाने केला खुलासा

स्टार स्पोर्ट्ने आपल्या सोशल मीडियावर माजी खेळाडूंच्या सामन्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ बघून क्रिकेट चाहत्यांना २००७ मधील टी २० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याची आठवण झाली. साखळी फेरीत झालेल्या सामन्यात दोन्ही संघांनी सारखीच धावसंख्या केली होती. तेव्हा महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने ‘बॉल आउट’मध्ये पाकिस्तानचा पराभव केला होता.

तेव्हा भारताकडून विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग आणि रॉबिन उथप्पा यांनी बरोबर स्टंपवर चेंडू मारला होता. तर, पाकिस्तानकडून यासिर अराफत, उमर गुल आणि शाहिद आफ्रिदी यांनी चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, एकालाही यश मिळाले नव्हते.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Former indian cricketers played a friendly bowl out match against pakistan ahead of asia cup 2022 vkk

Next Story
Asia Cup 2022: “मला सौरव गांगुलीच्या बरगड्यांवर चेंडू फेकण्यास सांगितलं होतं”; पाकिस्तानच्या गोलंदाजाने केला खुलासा
फोटो गॅलरी