पॅरिस : सर्बियाच्या तिसऱ्या मानांकित नोव्हाक जोकोव्हिचने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर, महिला एकेरी गटात अरिना सबालेन्का आणि चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना मुचोव्हा यांनी आपापल्या उपांत्यपूर्व सामन्यात विजय नोंदवत उपांत्य फेरीत धडक मारली.

जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक असलेल्या जोकोव्हिचने कारेन खाचानोव्हवर ४-६, ७-६ (७-०), ६-२, ६-४ असा विजय नोंदवला. पहिल्या सेटमध्ये खाचानोव्हने जोकोव्हिचला चांगली टक्कर दिली. त्याने सेट ६-४ असा जिंकत आघाडी घेतली. यानंतर मात्र, जोकोव्हिचने आपला खेळ उंचावताना खाचानोव्हला पुनरागमनाची संधीच दिली नाही आणि सलग तीन सेट जिंकत उपांत्य फेरीतील आपली जागा निश्चित केली. पुरुष एकेरीत डेन्मार्कच्या होल्गर रूनने अर्जेटिनाच्या फ्रॅन्सिस्को सेरुनडोलोला ७-६ (७-३), ३-६, ६-४, १-६, ७-६ (१०-७) असे चुरशीच्या लढतीत नमवले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिला एकेरीत दुसऱ्या मानांकित सबालेन्काने युक्रेनच्या एलिना स्वितोलिनावर ६-४, ६-४ असा विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच सबालेन्काने स्वितोलिनावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. सबालेन्काच्या अचूक फटक्यांचे स्वितोलिनासमोर उत्तर नव्हते. अन्य सामन्यात, बिगरमानांकित मुचोव्हाने २०२१च्या उपविजेत्या अनास्तासिया पावलुचेनकोव्हाला ७-५, ६-२ असे सरळ सेटमध्ये नमवत स्पर्धेची प्रथमच उपांत्य फेरी गाठली. तिने दुसऱ्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. फ्रेंच टेनिसमध्ये गेल्या वर्षी तिने तिसरी फेरी गाठली होती. पावलुचेनकोव्हाचा गेला सामना तीन तासांहून अधिक चालला. त्यामुळे सामन्यातील खेळावर त्याचा परिणाम जाणवला. पहिल्या सेटमध्ये आव्हान उपस्थित करणाऱ्या पावलुचेनकोव्हाला दुसऱ्या सेटमध्ये फार काही करता आले नाही. अन्य सामन्यात, अग्रमानांकित पोलंडच्या इगा श्वीऑनटेकला युक्रेनच्या लेसिया त्सुरेन्कोविरुद्ध पुढे चाल मिळाली. श्वीऑनटेक पहिल्या सेटमध्ये ५-१ अशी आघाडीवर असताना त्सुरेन्कोने माघार घेतली.