रविवारी भारतीय संघानं वर्ल्डकप स्पर्धेमध्ये इतिहास घडवत न्यूझीलंडला आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत तब्बल २० वर्षांनंतर हरवण्याची किमया साध्य केली. याआधी २००३ सालच्या वर्ल्डकप स्पर्धेत भारतानं न्यूझीलंडला नमवलं होतं. मात्र, गेल्या २० वर्षांत भारताला हे करता आलं नव्हतं. एकीकडे रविवारी भारतीय संघाच्या या विजयाचं सेलिब्रेशन होत असताना दुसरीकडे भारताचा माजी डावखुरा सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरनं केलेल्या विधानाची जोरदार चर्चा सध्या पाहायला मिळत आहे. गौतम गंभीर रविवारच्या सामन्यासाठी कॉमेंट्री करत असताना त्यानं केलेल्या या विधानामुळे अनेक उलट-सुलट चर्चांना उधाण आलं आहे.

रविवारी झालेल्या सामन्यामध्ये न्यूझीलंडनं विजयासाठी ठेवलेलं २७४ धावांचं आव्हान भारतानं दोन षटकं व ४ गडी राखून पार केलं. मात्र, विराट कोहलीला कारकिर्दीतल्या ४९व्या एकदिवसीय शतकानं हुलकावणी दिल्याचं शल्य भारतीय संघाबरोबरच तमाम क्रिकेट चाहत्यांच्या मनात राहिलं. विराट कोहली ९५धावांवर असताना भारताला विजयासाठीही ५ धावाच शिल्लक होत्या. मात्र. तेव्हा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात विराट कोहली बाद झाला. मात्र, भारताची फलंदाची चालू असतानाच कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेल्या गौतम गंभीरनं केलेल्या विधानावरून तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.

काय म्हणाला गौतम गंभीर?

कॉमेंट्री बॉक्समध्ये २०१९ साली न्यूझीलंडनं भारताला सेमीफायनलमध्ये हरवल्यामुळे भारताचं वर्ल्डकपमधलं आव्हान संपुष्टात आल्याच्या मुद्द्यावर चर्चा चालू होती. तेव्हाच्या संघातील खेळाडूंचा मुद्दा निघाला असता गौतम गंभीरनं “२०१९ची निवड समिती ही भारताच्या इतिहासातली सर्वात वाईट निवड समिती होती”, असं विधान केलं. विशेष म्हणजे, तेव्हा त्याच्या बाजूला कॉमेंट्री बॉक्समध्ये तेव्हाचा भारतीय संघाचा फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगरही बसला होता!

IND vs NZ: न्यूझीलंडचा अश्वमेध टीम इंडियाने रोखला! २० वर्षाचा दुष्काळ संपवला, चार गडी विजय…

“मला वाटतं की भारतीय क्रिकेटच्या इतिहासातली ती सर्वात वाईट निवड समिती होती. कारण तुम्ही वर्ल्डकपच्या संघातून अंबाती रायडूसारख्या फलंदाजाला वगळता. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी कोण करणार? ही तुमची समस्या असताना तुम्ही त्याच्याऐवजी दुसऱ्या कुणालातरी संघात घेता. विशेष म्हणजे तुम्ही वर्षभर अंबाती रायडूला वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये त्या क्रमांकावर खेळवलं होतं. त्यामुळे त्या संघात अंबाती रायडूचं स्थान असायला हवं होतं”, असं गौतम गंभीर म्हणाला.

“निवड समितीचे अध्यक्ष कोण होते आठवत नाही”

दरम्यान, त्यावेळी नेमकं कोण निवड समितीच्या अध्यक्षपदी होतं हे आपल्याला आठवत नाही, असंही गौतम गंभीर म्हणाला. “त्यांनी असं का केलं हे कुणालाच माहिती नाही. त्याबद्दल काय स्पष्टीकरण देण्यात आलं हेही माहिती नाही. त्यामुळे या सगळ्याची सर्वात पहिली जबाबदारी ही तत्कालीन निवड समिती अध्यक्षांचीच आहे”, असंही गौतम गंभीर म्हणाला.

IND vs NZ: “…सबका बदला लेगा तेरा चिकू”; माहीच्या नावाचं पोस्टर व्हायरल होताच, चाहत्यांना झाली धोनीच्या रनआऊटची आठवण…

“व्हीव्हीएस लक्ष्मणच्या बाबतीतही हेच घडलं!”

दरम्यान, अंबाती रायडुच्या बाबतीत जे घडलं, तेच २००३ साली व्हीव्हीएस लक्ष्मणच्या बाबतीतही घडल्याचं गंभीर म्हणाला. व्हीव्हीएस लक्ष्मणला २००३ सालच्या वर्ल्डकप संघात स्थान देण्यात आलेलं नव्हतं. त्यावरूनही गंभीरनं टिप्पणी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१९चा वर्ल्डकपचा संघ निवडणाऱ्या निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद होते. त्यांच्यासह देवांग गांधी, शरणदीप सिंग, जतिन परांजपे व गगन खोडा हे त्या समितीचे सदस्य होते.