वेस्ट इंडिजचा घरच्या मैदानावर पराभव केल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीचा भारतीय संघ जाहीर झाल्यापासून चर्चांना उधाण आलं आहे. यादरम्यान ऑस्ट्रेलियाविरूद्ध मालिकेसाठी संघात निवड झालेल्या हर्षित राणाला गेल्या काही दिवसांपासून प्रचंड ट्रोल केलं जात आहे. यावर आता कोच गौतम गंभीरने मोठं वक्तव्य केलं.

भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेनंतर गौतम गंभीर पत्रकार परिषदेसाठी आला तेव्हा त्याला हर्षित राणाबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला, ज्याच्या उत्तरात त्याने हर्षित राणाला २३ वर्षांचा मुलगा आहे म्हणत त्याची बाजू घेतली. गौतम गंभीरला सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्या हर्षित राणाबद्दल प्रश्न विचारताच कोच संतापले.

हर्षित राणाची ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेसाठी भारताच्या वनडे आणि टी-२० संघात निवड करण्यात आली. आयपीएल २०२४ नंतर हर्षित राणाने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण केलं. पण यादरम्यान त्याची कामगिरी सर्वसाधारण राहिली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरूद्ध मालिकेसाठी निवड करण्यात आल्यावर त्याला ट्रोल केलं गेलं. यामध्ये माजी खेळाडू क्रिष्णमचारी श्रीकांत यांनीही वक्तव्य केलं होतं. श्रीकांत यांनी हर्षित राणा हा भारताचा ऑल फॉरमट प्लेअर असल्याचं त्यांनी म्हटलं. तर अश्विनने देखील याबाबत वक्तव्य केलं होतं.

हर्षित राणाबद्दल प्रश्नावर उत्तर देताना गंभीरने म्हटलं की, “जर तुम्ही फक्त तुमचं युट्युब चॅनेल चालवण्यासाठी २३ वर्षीय खेळाडूवर टीका करत असाल, तर ते अन्यायकारक आहे. त्याचे वडील ना माजी अध्यक्ष आहेत, ना माजी क्रिकेटपटू, ना NRI. तो स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर क्रिकेट खेळत इथेपर्यंत आला आहे आणि पुढेही तसाच खेळत राहिल. एखाद्या व्यक्तीला असं लक्ष्य करणं योग्य नाही, कामगिरीवर टीका करा, त्यासाठी निवड समिती आहेच. पण तुम्ही जर सोशल मीडियावर २३ वर्षांच्या मुलाबद्दल घाणेरड्या गोष्टी बोललात, तर त्याच्या मनोवृत्तीवर काय परिणाम होईल?”

“जर उद्या तुमचा मुलगा क्रिकेट खेळायला लागला आणि त्याला अशा प्रकारे ट्रोल केलं गेलं, तर कल्पना करा, कसं वाटेल? तो फक्त २३ वर्षांचा मुलगा आहे, ३३ वर्षांचा नाही. माझ्यावर टीका करा, मी ती झेलू शकतो, पण २३ वर्षांच्या मुलावर अशी टीका करणं अजिबात योग्य नाही. भारतीय क्रिकेटबद्दल आपली एक नैतिक जबाबदारी असली पाहिजे, फक्त युट्युब चॅनेल चालवण्यासाठी असं करणं चुकीचं आहे. हे फक्त हर्षितपुरतं नाही, तर भविष्यातल्या इतर खेळाडूंनाही लागू होतं,” असं गंभीर पुढे म्हणाले.