ऑस्ट्रेलियाचा संघ सहा वर्षांनंतर टी२० सामने खेळण्यासाठी मोहालीत येणार आहे. भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध ३ सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. टी२० विश्वचषकाच्या दृष्टीने दोन्हीही संघांसाठी ही मालिका अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. या टी२० मालिकेतूनच भारतीय संघ आगामी टी२० विश्वचषकाची तयारी करत आहे. आशिया चषकात झालेल्या पराभवानंतर भारताला अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. अशातच भारतीय संघाच्या माजी खेळाडूने कर्णधार रोहित शर्माला मोठे आव्हान दिले आहे.
गौतम गंभीरचे भारतीय संघाला आव्हान
कर्णधार रोहित शर्माच्या संघाला गौतम गंभीरचे आव्हान म्हणाला “एकतर ऑस्ट्रेलिया संघाला हरवा नाहीतर विश्वचषकच विसरा.” दरम्यान, गौतम गंभीर आणि रोहित शर्मा हे २००७ मध्ये टी२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे सदस्य होते. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गंभीरने पाकिस्तानविरूद्ध ७५ धावा केल्या होत्या, तर रोहितने १६ चेंडूत ३० धावा केल्या होत्या. “२० सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या टी२० मालिकेत भारत ऑस्ट्रेलियाला हरवू शकला नाही, तर टी२० विश्वचषक जिंकणे आपल्यासाठी अवघड जाईल”, असे गौतम गंभीरने म्हटले. “मी हे आधीही बोललो आहे आणि पुन्हा सांगत आहे. २० सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाला हरवले नाही तर विश्वचषक विसरावा लागेल”, स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना असा विधान गंभीरने केला आहे.
हेही वाचा : धक्कादायक!! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी चंडीगड पोलिसांनी पीसीएकडून मागितले होते ५ कोटी
आगामी भारत वि. ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी२० मालिकेकडे विश्वविजेता आणि जागतिक क्रमवारीत नंबर १ संघ यांच्यातील लढत म्हणून पाहिले जात आहे. यामुळे साहजिकच ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढेल, असे मत गंभीरने व्यक्त केले आहे. जर भारताने आपल्या धरतीवर ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली तर टी२० विश्वचषक जिंकायला मदत होईल नाहीतर रोहित सेनेला मोठा संघर्ष करावा लागेल, असे गंभीरने पुढे म्हटले आहे.