वृत्तसंस्था, नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ग्रेग चॅपेल यांनी ‘सकारात्मक क्रिकेट म्हणजे बेजबाबदार फटकेबाजी नव्हे’ अशा शब्दांत इंग्लंड क्रिकेट संघाच्या ‘बॅझबॉल’ शैलीवर टीका केली असून, त्याच वेळी भारताच्या तरुण संघाच्या निर्भयतेचे कौतुक केले आहे. एका संकेतस्थळावर लिहिलेल्या स्तंभात चॅपेल यांनी भारताविरुद्धच्या अतिशय अटीतटीच्या कसोटी मालिकेदरम्यान इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये चिकाटीचा आणि सामन्याची परिस्थितीत समजून घेण्याचा अभाव दिसून असल्याचे मत मांडले आहे.
चॅपेल यांचा रोख विशेषत: हॅरी ब्रूकच्या फलंदाजीवर होता. ‘‘उच्च दर्जाच्या फलंदाजाकडे असणारे सर्व गुण ब्रूककडे आहेत. तो वैविध्यपूर्ण फटके मारण्यातही सक्षम आहे. मात्र, कसोटी क्रिकेट खेळताना केवळ फटके मारायचे नसतात, तर कुठल्या चेंडूवर आक्रमक व्हायचे, कुठला चेंडू खेळून काढायचा, केव्हा संयम बाळगायचा हे समजून खेळणे आवश्यक असते. अखेरच्या कसोटीत अतिशय बेजबाबदारपणे खेळलेल्या फटक्याने ब्रूक बाद झाला आणि सामन्याला कलाटणी मिळाली,’’ असे चॅपेल यांनी लिहिले.
‘‘निर्भयता आणि आक्रमकता या ‘बॅझबॉल’ शैलीने इंग्लंड संघाला कसोटी क्रिकेटमध्ये जरूर पुनरुज्जीवन मिळाले. मात्र, तेच आता त्यांच्या पराभवाचेही कारण ठरत आहे. विजयासाठी मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडने एकवेळ आपली बाजू सुरक्षित केली होती. त्यावेळी एका फलंदाजाने खेळपट्टीवर थांबणे आवश्यक होते. क्रिकेटमध्ये सकारात्मकता जरूर असावी, पण त्या सकारात्मकतेत बेपर्वाई नसावी,’’ असे मत मांडताना चॅपेल यांनी ब्रूकने आक्रमकतेला संयमाची जोड दिली, तर भविष्यात तो जो रूटचा उत्तराधिकारी ठरू शकतो असेही म्हटले आहे.
‘‘ब्रूक अजून शिकत आहे. इंग्लंडला सामना जिंकवून देणारा खेळाडू बनण्यासाठी त्याला दमदार आणि जबाबदारीची खेळी कराव्या लागतील. रूट सहजासहजी इंग्लंडचा यशस्वी फलंदाज बनला नाही. त्याने कष्टाने आणि धैर्याने हे सगळे कमावले आहे. ब्रूकलाही तेच करून दाखवावे लागेल,’’ असेही चॅपेल यांनी या स्तंभात लिहिले आहे. ‘‘या मालिकेतील दोन सामन्यांत असे काही वेगळे घडले की ते अतर्क्य होते. ऋषभ पंत आणि ख्रिस वोक्स गंभीर जखमी असूनही आपल्या संघाच्या मदतीसाठी तशाही परिस्थितीत मैदानात उतरले. ही खूप मोठी गोष्ट आहे,’’ अशा शब्दांत चॅपेल यांनी दोन खेळाडूंचे कौतुक केले.
भारताचा ‘नैतिक’ विजय
भारताचा संघ तरुण होता. तुटपुंज्या अनुभवाच्या जोरावर या संघाने दाखवलेली निर्भयता बघितली, तर ते अधिक कौतुकास पात्र ठरतात. मालिका बरोबरीत राहिली असली, तरी मी हा भारताचा नैतिक विजय मानतो. या मालिकेतील कामगिरीसह त्यांनी स्वतंत्र ओळख मिळवली असेच म्हणता येईल, असेही चॅपेल यांनी म्हटले आहे.