Women’s T20 World Cup 2023 Semifinal: महिला टी-२० विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाला. ज्यामुळे भारतीय संघासह कोट्यवधी भारतीयांचे मने दुखावली. उपांत्य फेरीत कांगारूंकडून ५ धावांनी पराभव झाल्यानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरही भावूक झाली. सामना हरल्यानंतर हरमनप्रीत कौर चष्मा घालून मॅचनंतरच्या प्रेझेंटेशनमध्ये पोहोचली, जेव्हा प्रेझेंटर तिच्याशी बोलत होती, तेव्हा भारतीय कर्णधाराने सांगितले की, तिला आपल्या देशाने रडताना पाहावे असे वाटत नाही, म्हणूनच ती चष्मा घालून येथे आली आहे.

सामन्यानंतर हरमनप्रीत कौर म्हणाली, “माझ्या देशाने मला रडताना पाहावे असे मला वाटत नाही, म्हणूनच मी हा चष्मा घालून आले आहे, मी वचन देते की आम्ही आमचा खेळ सुधारू आणि देशाला पुन्हा असे निराश होऊ देणार नाही.”

सामन्याबद्दल बोलताना हरमन म्हणाली, “जेव्हा मी आणि जेमी (जेमिमा रॉड्रिग्स) फलंदाजी करत होतो आणि नंतर पराभूत झालो त्यापेक्षा दुर्दैवी असू शकत नाही. आज आम्हाला याची अपेक्षा नव्हती. मी ज्याप्रकारे धावबाद झाले त्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट असूच शकत नाही. प्रयत्न करणे जास्त महत्त्वाचे होते. आम्ही शेवटच्या चेंडूपर्यंत लढण्याची चर्चा केली. निकाल आमच्या बाजूने लागला नाही, पण आम्ही या स्पर्धेत ज्या प्रकारे खेळलो त्यामुळे मी खूश आहे.”

पराभवाबद्दल बोलताना कौरने पुढे सांगितले की, “आम्ही लवकर विकेट गमावल्या तरीही आमच्याकडे चांगली फलंदाजी आहे हे आम्हाला माहीत आहे. जेमीने आज ज्याप्रकारे फलंदाजी केली त्याचे श्रेय तिला द्यावे लागेल. आम्ही शोधत असलेली गती तिने आम्हाला दिली. अशी कामगिरी पाहून आनंद होतो. तिचा नैसर्गिक खेळ खेळताना पाहून आनंद झाला. आम्ही आमच्या ताकदीनुसार खेळलो नसलो तरीही आम्ही उपांत्य फेरी गाठली. आम्ही ते सोपे झेल सोडले. तुम्हाला जिंकायचे असेल तेव्हा त्यांना पकडावे लागेल. आम्ही खराब क्षेत्ररक्षण केले. आपण या गोष्टींमधून फक्त शिकू शकतो आणि चुका पुन्हा करू शकत नाही.”

हेही वाचा – INDW vs AUSW Semifinal: ऑस्ट्रेलियाने भारताच्या आशांवर फेरले पाणी; ५ धावांनी विजय नोंदवून मिळवले फायनलचे तिकीट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सामन्याबद्दल बोलायचे तर, ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या संघाने २० षटकांत ४ बाद १७२ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर भारतासमोर १७३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघाला ६ बाद १६७ धावाच करता आल्या. ज्यामुळे भारतीय संघाला ५ धावांनी पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे पुन्हा एकदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले.