IND W vs NZ W Harmanpreet Kaur Statement on Team India Defeat: महिला टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला सामन्यात ५८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत १६० धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडिया १९ षटकांत १०२ धावांवरच मर्यादित राहिली. अशाप्रकारे भारतीय संघ या सामन्यात खूपच मागे पडला. टीम इंडियाचा दुसरा सामना आता रविवारी पाकिस्तानशी होणार आहे. तत्त्पूर्वी या पराभवानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर नेमकं काय म्हणाली, जाणून घेऊया.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात १६१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियाने पॉवर प्लेमध्येच सलामीवीर फलंदाज शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांच्या विकेट्स गमावल्या. यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने काही काळ आकर्षक शॉट्स खेळत संघाच्या आशा कायम ठेवल्या पण तीही बाद झाली. हरमनप्रीत कौर बाद होताच टीम इंडियावर दबाव वाढला जो मधल्या फळीतील फलंदाजांना सांभाळता आला नाही. यानंतर एकामागून भारताचे सर्व फलंदाज बाद झाले. कसेतरी संघाने १०० धावांचा टप्पा गाठला.

हेही वाचा – IND W vs NZ W: भारताबरोबर पहिल्याच सामन्यात झाली चिटिंग, पंचांच्या चुकीमुळे भारताने गमावली विकेट, हरमनप्रीत-कोच भडकले, VIDEO व्हायरल

IND W vs NZ W: भारताच्या पराभवावर कर्णधार हरमनप्रीत कौरचे मोठे विधान

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातही टीम इंडियाची गोलंदाजी साधारण होती. पॉवर प्लेमध्ये भारतीय संघाला एकाही फलंदाजाला बाद करता आले नाही. न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली. यानंतर सोफी डिव्हाईनने डावाची धुरा सांभाळली आणि वेगाने धावा करण्यात ती यशस्वी ठरली. सोफीने आपल्या संघासाठी ५७ धावा करत नाबाद राहिली. गोलंदाजीदरम्यान भारतीय संघाची साधारण फिल्डिंगही पाहायला मिळाली. भारताने २ ते ३ कॅच सोडल्या, ज्याचा फटका त्यांना सामन्यात बसला.

हेही वाचा – Salil Ankola: माजी क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या आईचा संशयास्पद मृत्यू, गळ्यांवर जखमांच्या खूणा

भारताच्या या मानहानीकारक पराभवावर कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली, “आज आम्ही आमचे सर्वोत्तम क्रिकेट खेळलो नाही. पुढे जाण्याआधी आम्हाला कुठे सुधारणा करायची आहे याचा विचार करावा लागेल. आता प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे आणि आम्हाला आमचे सर्वोत्तम क्रिकेट खेळायचे आहे. आम्ही खेळत असताना सामना फिरवण्याच्या संधी निर्माण केल्या, पण ते आमच्यापेक्षा चांगले क्रिकेट खेळले, यात शंका नाही. या टप्प्यावर येऊन आपण या चुका करू शकत नाही. आम्ही अनेकवेळा १६०-१७० धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. पण या खेळपट्टीवर जास्तीच्या १०-१५ धावा खूप होत्या. एका टप्प्यावर, त्यांनी ज्या प्रकारे सुरुवात केली, मला वाटत होतं की ते १८० धावांचे लक्ष्य ठेवतील. आमच्या अपेक्षेप्रमाणे या टूर्नामेंटची सुरूवात झालेली नाही.”

भारताला आता गट टप्प्यात अजून तीन सामने खेळायचे आहेत. भारताचा पुढील सामना ६ ऑगस्टला रविवारी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.