Abhishek Nayar On Rohit Sharma Fitness Formula: भारतीय संघातील हिटमॅन म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा गेल्या ७ महिन्यांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. पण बाहेर असतानाही रोहित तुफान चर्चेत होता. यावेळी रोहित आपल्या फलंदाजीमुळे नव्हे, तर फिटनेसमुळे चर्चेत राहिला. नेहमी फिटनेसमुळे ट्रोल होणाऱ्या रोहितने आपल्या फिटनेसवर प्रचंड मेहनत घेतली आणि ११ किलो वजन कमी करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
रोहित भारतीय संघातून बाहेर असताना भारतीय संघाचा माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरसोबत मिळून आपल्या फिटनेसवर प्रचंड मेहनत घेत होता. जिममध्ये फिटनेस असो की नेट्समध्ये फलंदाजीचा सराव. अभिषेक नायर नेहमीच रोहितला मदत करताना दिसून आला. वजन कमी केल्यानंतर अभिषेक नायरने रोहित शर्मासोबतचा जिममधील फोटो शेअर केला होता.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या सामन्यात पुनरागमन करताना रोहितला हवी तशी कामगिरी करता आली नाही. रोहित अवघ्या ८ धावा करून झेलबाद होऊन माघारी परतला. जिओस्टारवर बोलताना अभिषेक नायरने रोहितने वजन कमी करताना नेमकं काय काय केलं? याबाबत खुलासा केला. रोहित दररोज ३ तास सराव करायचा असे अभिषेक नायरने सांगितले.
अभिषेक नायर रोहितच्या फिटनेसचा प्रवास सांगताना म्हणाला, “थोडक्यात सांगायचं तर, दररोज ३ तासांचे प्रशिक्षण, आम्ही कार्डीओवर जास्त भर दिला नाही. सुरूवातीच्या ५ आठवड्यात त्याची मानसिकता एका बॉडीबिल्डरसारखी होती. जिथे त्याला फक्त वजन कमी करायचे होते. त्याने जास्त रेपिटेशन्स करून एका बॉडीबिल्डरप्रमाणे प्रशिक्षण घेतले.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “रोहित शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी ७०० ते ८०० रेपिटेशन्स पूर्ण करत होता. कल्पना करा छाती आणि ट्रायसेप्सच्या व्यायामासाठी तो ७०० ते ८०० रेपिटेशन्स पूर्ण करत होता. प्रत्येक सत्राचा शेवट हा आम्ही १५ ते २० मिनिटांच्या क्रॉस फिटने करत होतो. जो कार्डिओचा एक भाग आहे.” हे प्रशिक्षण आठवड्यातून ६ दिवस आणि ३ तास असेच सुरु होते. असे अभिषेक नायरने सांगितले. रोहितचा हिटमॅन टू फिटमॅन बनण्याचा प्रवास हा मुळीच सोपा नव्हता. पण रोहितने प्रचंड मेहनत घेतली आणि ट्रोल करणाऱ्यांना चांगलच उत्तर दिलं.