भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी भारताचा माजी कर्णधार एम. एस. धोनीचं कौतुक केलं आहे. धोनी इतका शांत आणि संयमी भारतीय कर्णधार आपण यापूर्वी पाहिला नव्हता, असं शास्त्री म्हणाले. माझ्याकडे आजही धोनीचा फोन नंबर नाहीय, असंही शास्त्री म्हणालेत. धोनीने ठरवलं तर तो अनेक दिवस मोबाईल न वापरता राहू शकतो असं सांगताना शास्त्रींनी आपल्याकडे त्याचा नंबरही नसल्याचं सांगितलं.

टी-२० विश्वचषक आणि एकदिवसीय क्रिकेटमधील विश्वचषक जिंकून देणाऱ्या धोनीसोबत रवि शास्त्री यांनी संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि व्यवस्थापक म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. सामन्याचा निकाल काहीही लागला तरी तो फार निराश किंवा आनंदी होत नाही. मी त्याला कधीच फार संतापलेल्या अवस्थेत पाहिलं नाही. सामन्यांच्या निकालाचा त्याच्यावर नाकारात्मक परिणाम होत नाही, असंही शास्त्री म्हणालेत.

“तो शून्यावर बाद झाला काय किंवा त्याने शतक ठोकलं काय, किंवा तो विश्वचषक जिंकला असेल अथवा पहिल्याच फेरीत बाहेर पडला असेल तरी त्याच्यावर याचा परिणाम होत नाही. मी अनेक क्रिकेटपटू पाहिलेत पण त्याच्यासारखं कोणीही नाहीय. सचिन तेंडुलकरही फार संयमी आहे पण तो कधीकधी रागावतोय. मात्र धोनीचं असं होतं नाही,” असं शास्त्रींनी शोएब अख्तरच्या युट्यूब चॅनेलवर मुलाखतीदरम्यान सांगितलं.

“त्याने ठरवलं तर तो अनेक दिवस फोनपासून दूर राहू शकतो. आजही माझ्याकडे त्याचा नंबर नाहीय. मी कधीच त्याला त्याचा फोन नंबर मागितला नाही. तो स्वत: सोबत फोन घेऊन फिरत नाही. जेव्हा तुम्हाला त्याच्याशी संपर्क करायचा असतो तेव्हा तुम्हाला माहितीय की कोणता मार्ग निवडायचा. तो फारच प्रेमळ आणि शांत आहे,” असं शास्त्री यांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ऑगस्ट २०२० रोजी निवृत्ती घेतलीय. मात्र तो इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व करतो. चेन्नईने २०२२ च्या आयपीएल लिलावाआधी रिटेन केलेल्या चार खेळाडूंमध्ये धोनीचा समावेश आहे.