आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तान जलदगती गोलंदाजांची खाण म्हणून ओळखला जातो. ९० च्या दशकात वासिम अक्रम, वकार युनूस, शोएब अख्तर अशा अनेक पाकिस्तानी गोलंदाजांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपलं नाव कमावलं. गेल्या वर्षी पाकिस्तानचा १७ वर्षीय उंचपुरा गोलंदाज नसीम शहाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत आपली गती आणि चेंडू स्विंग कौशल्यामुळे नसीमने सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडली. काही महिन्यांपूर्वी बांगलादेशविरुद्ध रावळपिंडी येथे झालेल्या क्रिकेट सामन्यात नसीमने हॅटट्रीकची नोंद करत, अशी कामगिरी करणारा सर्वात तरुण गोलंदाज हा बहुमान पटकावला होता.

१७ वर्षीय नसीम शहाला एकदा भारताचा कर्णधार विराट कोहलीला गोलंदाजी करायची आहे. “होय नक्कीच, भारत विरुद्ध पाकिस्तान हे सामने नेहमीच खास असतात आणि मला अनेकांनी सांगितलं आहे की या सामन्यांमध्ये खेळाडू एकतर हिरो ठरतात किंवा टीकेचे धनी होतात. मलाही भारताविरुद्ध एकदा खेळायचं आहे. भारताविरुद्ध खेळायची संधी मिळाली तर मी चांगली कामगिरी करेन आणि पाकिस्तानी चाहत्यांना निराश होऊ देणार नाही अशी मला खात्री आहे. विराट कोहलीचा फलंदाज म्हणून मी आदर करतो पण मी त्याला घाबरत नाही.” नसीम शाह पाकिस्तानमधील एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

सर्वोत्तम फलंदाजासमोर गोलंदाजी करणं हे नेहमी आव्हान असतं. पण तिकडेच तुम्हाला तुमचा खेळ उंचवण्याची गरज असते, ज्यावेळी भारत-पाकिस्तान सामने होतील…त्यावेळी मी विराटला गोलंदाजी करण्याची संधी सोडणार नाही. नसीमने आपले मनसुबे स्पष्ट केले. सध्या करोनामुळे सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने बंद आहेत. सामने रद्द होत असल्यामुळे होणारं आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी आयसीसी पुन्हा सामने सुरु करता येतील का याचा विचार करत आहे. तोपर्यंत क्रिकेट प्रेमींना आपले आवडते खेळाडू परत मैदानात कधी उतरतात याची वाट पहावी लागणार आहे.