ICC T20 Rankings: आशिया चषक २०२५ स्पर्धेत भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने स्पर्धेतील सुरुवातीच्या चारही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. भारताकडून डावाची सुरुवात करताना अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल यांनी दमदार सुरुवात करून दिली आहे. दोघांनाही या कामगिरीची फायदा आयसीसी रँकिंगमध्ये झाला आहे. अभिषेक शर्मा अव्वल स्थानी कायम आहे. तर शुबमन गिलने देखील आयसीसी फलंदाजांच्या यादीत मोठी झेप घेतली आहे.

अभिषेक शर्मा अव्वल स्थानी कायम

आशिया चषक सुपर ४ फेरीतील दुसऱ्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात धावांचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल या जोडीने पाकिस्तानच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. अभिषेकने अर्धशतकी खेळी केली. तर गिल देखील अर्धशतकाच्या जवळ पोहोचला होता. आयसीसी टी-२० फलंदाजांच्या यादीत अभिषेक शर्मा ९०७ रेटिंग पॉईंट्ससह अव्वल स्थानी कायम आहे. तर गिलने ७ पायऱ्या वर चढत ३२ वे स्थान गाठले आहे. गिलने ५७४ रेटिंग पॉईंट्सची कमाई केली आहे.

गिलने बऱ्याच महिन्यांनी भारतीय टी-२० संघात स्थान मिळवलं आहे. डावाची सुरूवात करताना त्याने अभिषेकसोबत मिळून चांगली सुरूवात करून दिली आहे. तर दुसरीकडे संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला या स्पर्धेत हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. तो ७२९ रेटिंग पॉईंट्ससह गुणतालिकेत सहाव्या स्थानी पोहोचला आहे.

तर तिलक वर्मा ७९१ रेटिंग पॉईंट्ससह तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. भारतीय संघाचा पुढील सामना आज बांगलादेशविरुद्ध होणार आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांकडून आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. या यादीत अभिषेक शर्मा अव्वल स्थानी आहे. तर फिल सॉल्ट दुसऱ्या स्थानी, तिलक वर्मा तिसऱ्या स्थानी, जोस बटलर चौथ्या स्थानी आणि ट्रेव्हिस हेड पाचव्या स्थानी आहे. तर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव सहाव्या स्थानी,पथुम निसंका सातव्या स्थानी, टीम सिफर्ट आठव्या स्थानी, टीम डेव्हिड नवव्या स्थानी आणि डेवाल्ड ब्रेविस दहाव्या स्थानी आहे.